Home » जावळी » शिपाई ते मुख्याध्यापक असा प्रेरणादायी प्रवास करणारे आदर्श शिक्षक नंदकुमार जगताप यांचे निधन; सायगावसह कोयना परिवारावर शोककळा

शिपाई ते मुख्याध्यापक असा प्रेरणादायी प्रवास करणारे आदर्श शिक्षक नंदकुमार जगताप यांचे निधन; सायगावसह कोयना परिवारावर शोककळा

पांचगणी न्यूज नेटवर्क 

दापवडी : अत्यंत गरीब परिस्थितीतून जिद्दीच्या बळावर शिपाई पदापासून प्रवास सुरू करत पुढे शिक्षक व मुख्याध्यापक पदापर्यंत मजल मारणारे, इतिहास विषय तज्ज्ञ व अमोघ वक्तृत्वाचे धनी नंदकुमार जगताप सर यांचे आज दुःखाद निधन झाले. त्यांच्या या अकाली जाण्याने सायगाव परिसरासह संपूर्ण कोयना एज्युकेशन सोसायटी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

​नंदकुमार जगताप सरांचा संपूर्ण जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी राहिला. एका अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या जगताप सरांनी कोयना एज्युकेशन सोसायटीमध्ये सुरुवातीला शिपाई म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली होती. मात्र शिक्षणाची अथांग ओढ आणि अखंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे याच संस्थेत शिक्षक आणि नंतर पदोन्नतीने मुख्याध्यापक पदावरून ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा हा जीवनप्रवास परिसरातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि तरुणांसाठी सदैव मार्गदर्शक ठरणारा आहे.

​आपल्या संपूर्ण सेवाकाळात त्यांनी संस्थेच्या अत्यंत बिकट व आव्हानात्मक शाखांमध्ये मोठ्या निष्ठेने ज्ञानदानाचे कार्य केले. सायगाव, तळदेव, कुंभरोशी, दापवडी आणि वाघावळे-उचाट यांसारख्या दुर्गम भागातील शाळांमध्ये कार्यरत असताना, तेथील भौगोलिक आणि भौतिक अडचणींवर मात करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य दिले.

​इतिहास विषयाचे सखोल अभ्यासू असणाऱ्या जगताप सरांचे अमोघ वक्तृत्व, अभ्यासू मांडणी आणि बहारदार सूत्रसंचालन कला यामुळे त्यांचा प्रत्येक कार्यक्रम उपस्थितांच्या विशेष लक्षात राहायचा. शालेय सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी ते नेहमी आग्रही असत. खऱ्या अर्थाने विद्यार्थीप्रेमी असलेल्या जगताप सरांचा पालकांशीही दांडगा संपर्क होता. विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक व वैयक्तिक अडचणी समजून घेण्यासाठी ते स्वतः पालकांच्या गृहभेटी घेत असत आणि विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करत.

​आपल्या हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे आणि शिक्षकवृंदातील उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे त्यांनी नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन काम केले. अगदी अडचणीच्या आणि दुर्गम ठिकाणी शाळा असतानाही, सर्व स्टाफला एकत्र आणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबवले.

​आपल्या आपुलकीच्या आणि मनमिळाऊ स्वभावाने प्रत्येकाचे मन जिंकणारे एक ध्येयवादी, समर्पित आणि मार्गदर्शक शिक्षक अचानक निघून गेल्यामुळे शिक्षण क्षेत्राचे आणि सायगाव परिसराचे कधीही भरून न येणारे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनानंतर कोयना परिवार, माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers