Home » सातारा » सर आईन्स्टाईन अकॅडमीच्या गुणवंतांचे राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश; खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भव्य गौरव

सर आईन्स्टाईन अकॅडमीच्या गुणवंतांचे राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश; खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भव्य गौरव

पांचगणी न्यूज नेटवर्क 

सातारा : प्रवेश परीक्षांच्या क्षेत्रात सातत्याने आपल्या गुणवत्तेचा आणि यशाचा आलेख उंचावत ठेवणाऱ्या सातारा येथील नामांकित ‘सर आईन्स्टाईन अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी यंदाही राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘एनआयटी’ या केंद्रीय संस्थांमध्ये प्रवेश मिळविलेल्या अकॅडमीच्या चार गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सातारा येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सत्कार व गौरव करण्यात आला.

​अकॅडमीच्या या यशामध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत कठीण अशा प्रवेश परीक्षेत आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे. यामध्ये वेदांत राऊत याची ‘एनआयटी अलाहाबाद’ येथे, निराली कदम आणि आयुष शेवते यांची ‘एनआयटी नागपूर’ येथे, तर पायल कदम हिची ‘आयआयसीटी भदोही’ (IICT Bhadohi) या नामांकित राष्ट्रीय संस्थेमध्ये निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय आणि ऐतिहासिक यशाबद्दल श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आणि त्यांना पुढील उच्च शैक्षणिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

​या गौरवप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि त्यांचे अभिनंदन करताना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि कठोर मेहनतीच्या बळावर ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थीही आज राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू शकतात हे या मुलांनी सिद्ध केले आहे. अशा दर्जेदार गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांना खऱ्या अर्थाने घडवणाऱ्या शिक्षकांचा संपूर्ण सातारा जिल्ह्याला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांची पाठ थोपटली.

​सर आईन्स्टाईन अकॅडमीमध्ये दिले जाणारे गुणवत्तापूर्ण अध्यापन, प्रत्येक विद्यार्थ्यावर केले जाणारे वैयक्तिक लक्ष, नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या सराव चाचण्या आणि राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांवर आधारित पद्धतशीर अभ्यासपद्धतीमुळेच विद्यार्थ्यांना अशा कठीण परीक्षांमध्ये देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळविणे शक्य झाले आहे. अकॅडमीच्या या नेत्रदीपक यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून या गुणवंत विद्यार्थ्यांवर आणि अकॅडमीच्या व्यवस्थापनावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers