पांचगणी न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्याच्या अर्थकारणाची आणि सहकार क्षेत्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एसडीसीसी) २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अधिकृत बिगुल वाजला आहे. बँकेच्या एकंदर २१ संचालकपदांसाठी ही हायव्होल्टेज निवडणूक होणार असून, येत्या १ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान, तर ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडींना उधाण आले आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या अधिकृत कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज स्वीकारले जातील. दाखल अर्जांची पहिली यादी १ ऑक्टोबर रोजीच प्रसिद्ध होईल. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक कार्यालयात अर्जांची छाननी होणार असून ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ अशी तब्बल १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या काळात सहकारातील राजकीय गणिते, तडजोडी आणि बिनविरोधसाठीचे प्रयत्न ऐरणीवर येणार आहेत. २१ ऑक्टोबर रोजी माघारीची मुदत संपल्यानंतर २२ ऑक्टोबरला अंतिम रिंगणात उरलेल्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. त्यानंतर १ नोव्हेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान पार पडेल.
सातारा जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, विकास सेवा संस्था, दूध संस्था आणि सहकार चळवळीचा पाठीचा कणा मानली जाते. बँकेवरील वर्चस्वासाठी जिल्ह्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्ष, आजी-माजी आमदार आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. त्यामुळे या निवडणुकीची घोषणा होताच तालुक्यातील विकास संस्था आणि सहकार गटांमध्ये मोर्चेबांधणीला वेग आला आहे. १ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाकडे आणि ३ नोव्हेंबरच्या निकालाकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.



