Home » पांचगणी » सातारा जिल्हा बँक निवडणूक: रुपालीताई राजपुरे यांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर; सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशाने विरोधकांना चपराक! कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला आंनद व्यक्त

सातारा जिल्हा बँक निवडणूक: रुपालीताई राजपुरे यांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर; सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशाने विरोधकांना चपराक! कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला आंनद व्यक्त

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून रुपालीताई राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या उमेदवारीवरील आक्षेपा संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यामुळे रुपालीताईंच्या निवडणुकी लढवण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. न्यायालयीन लढाईतील या यशस्वी टप्प्यानंतर, “राजेंद्रशेठ राजपुरे जरी संचालक पदाच्या बाहेर जात असले, तरी आता रुपालीताई जिल्हा बँकेत नक्की जाणार,” असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी पाचगणीत जोरदार फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष केला. गेली १५ वर्षे संचालक म्हणून काम पाहणाऱ्या राजेंद्रशेठ राजपुरे यांना विरोधकांनी निवडणुकीबाहेर करण्याचा कितीही प्रयत्न केला असला, तरी रुपालीताईंच्या या जोरदार पुनरागमनाने विरोधकांच्या मनसुब्यांना मोठे पाणी फेरले असून त्यांना ही एक प्रकारे मोठी चपराक मानली जात आहे.

​महाबळेश्वर तालुक्यातील प्राथमिक कृषी पुरवठा विकास संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून रुपालीताई राजेंद्र राजपुरे यांनी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवला होता. मात्र, या निर्णयाविरोधात संजय मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेत, संस्थेच्या उपविधीनुसार दोन वर्षांच्या सदस्यत्वाच्या अटीचा मुद्दा पुढे करत आक्षेप घेतला होता. उच्च न्यायालयाच्या एका निकालामुळे काही काळ रुपालीताईंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.

​मात्र, राजपुरे कुटुंबाने आणि त्यांच्या समर्थकांनी या निर्णयाविरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत रुपालीताई राजपुरे यांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे त्यांची उमेदवारी कायदेशीर ठरली आहे. या कायदेशीर विजयामुळे महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले असून, आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून प्रत्यक्ष चुरशीची लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

 

​गेली अनेक वर्षे सहकार क्षेत्रात राजपुरे कुटुंबाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. रुपालीताई राजपुरे यांनी महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापतीपदावर पाच वर्ष कार्यकाळ सांभाळला आहे तर राजेंद्रशेठ राजपुरे यांनी १५ पेक्षा जास्त वर्षे सातारा जिल्हा बँकेचे संचालक म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवली आहे. यंदाच्या निवडणुकीत विरोधकांनी विविध कायदेशीर दांडगे आणि आक्षेपांच्या माध्यमातून राजपुरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या ताज्या निर्णयामुळे विरोधकांच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. आता रुपालीताई राजपुरे यांच्या रूपाने राजपुरे कुटुंब पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या सत्तेच्या केंद्रस्थानी झेपावणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. या घडामोडीमुळे महाबळेश्वरसह संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीत रंगतदार सामना पाहायला मिळणाèर आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers