Home » सातारा » सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची रणधुमाळी शिगेला; ९ जागा बिनविरोध, तर उर्वरित जागांसाठी चुरशीचे मैदान तयार

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची रणधुमाळी शिगेला; ९ जागा बिनविरोध, तर उर्वरित जागांसाठी चुरशीचे मैदान तयार

पांचगणी न्यूज नेटवर्क 

सातारा : सातारा सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य आणि जिल्ह्याची आर्थिक नाडी मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. संचालक मंडळाच्या १० वर्षांच्या मुदतीबाबत रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) धोरणात्मक निर्णयामुळे अनेक प्रस्थापितांना यंदा पायउतार व्हावे लागले, तर अनेकांना संधीचे नवीन दरवाजे उघडले. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत ‘विरोध आणि बिनविरोध’ यांचा हायव्होल्टेज खेळ रंगल्याचे पाहायला मिळाले. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आणि राजकीय जुळवाजुळव झाल्यानंतर अखेर ९ जागा बिनविरोध झाल्या असून, इतर जागांसाठी आता दुरंगी, तिरंगी आणि चौरंगी लढतीचे ढोल वाजू लागले आहेत.

 

​गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाच्या पारड्यात नारळ पडणार, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट तर्क-वितर्क लढवले जात होते. पडद्यामागून अनेक हालचाली सुरू असल्या तरी प्रत्यक्षात नेते मंडळी चहापानाच्या निमित्ताने एकमेकांना भेटून चर्चा करत होते, तर दुसरीकडे राजकीय अंदाज बांधण्याचे काम कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आले होते. या सर्व राजकीय घडामोडींचा अखेर बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जिल्हा बँकेच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात पडदा पडला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चित्र स्पष्ट केल्यानंतर आता कोणत्या मतदारसंघात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

​कुठे बिनविरोध, तर कुठे होणार महामुकाबला?

​प्राप्त झालेली अंतिम आकडेवारी पाहता, ९ जागांवर बिनविरोध निवड झाली असून इतर १२ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

​बिनविरोध झालेले प्रतिनिधी: प्राथमिक कृषी पतसंस्था प्रवर्गातून सासवडचे सर्जेराव दिनकरराव सावंत व खटावमधून नंदकुमार (नानासो) महादेव मोरे बिनविरोध आले आहेत. तसेच महिला राखीवमधून ऋतुजा राजेश पाटील आणि मंगल चंद्रकांत पाटील, कृषी उत्पादक व प्रक्रिया संस्थांतून अतुल सुरेश भोसले, नागरी बँका/पतसंस्था प्रवर्गातून रणजीतसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर, गृहनिर्माण व दूध उत्पादक संस्था प्रवर्गातून सोमनाथ रामचंद्र धुमाळ हे देखील बिनविरोध निवडले गेले आहेत. याशिवाय वाईमधून सत्यजीत सुरेश वीर हे देखील बिनविरोध झाले आहेत.

​चुरशीच्या लढती: पाटण, जावळी, महाबळेश्वर, माण, खंडाळा, कराड, कोरेगाव आणि फलटण या तालुक्यांतील विविध सोसायट्यांच्या जागांवर आता तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. विशेषतः महायुतीमधील राजकीय समिकरणे आणि अंतर्गत चुरस यामुळे या निवडणुका अधिक रंगतदार बनल्या आहेत.

​मतदारांची वाढलेली सरबराई आणि उमेदवारांची दमछाक

​निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदारांच्या आणि प्रतिनिधींच्या अपेक्षांना उधाण आले आहे. मतदारांना सहलींचा आनंद देण्यापासून ते त्यांना खूश ठेवण्यापर्यंत उमेदवारांची चांगलीच कसरत होताना दिसत आहे. “घोरपड बाई तुझी पाठ मऊ” या म्हणीप्रमाणे मतदारांच्या वाढलेल्या मागण्या आणि लाड पुरवताना उमेदवारांची अवस्था ‘न गिळता येणारे आणि न ओकता येणारे हाडूक’ अशी झाली आहे. निवडणुकीच्या या धडपडीत आर्थिक जुळवाजुळव करताना उमेदवारांच्या नाकीनऊ आले आहेत.

​आता अर्ज माघारीचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून, सातारा जिल्हा बँकेच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि सहकाराचा गड कोणता गट सर करणार, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि.का.स सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था सातारा : सावंत सर्जेराव दिनकरराव बिनविरोध निवड

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि.का.स सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था जावली

रांजणे ज्ञानदेव किसन आणी गोळे विठ्ठल गुलाबराव लढत

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि. का.स सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था- महाबळेश्वर

राजपुरे रुपाली राजेंद्र आणी मोरे संजय हरिचंद्र यांचेत लढत

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि.का.स सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था- कराड

पाटील उदयसिंह विलासराव आणी पाटील धनंजय तुकाराम यांच्यात लढत

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि.का.स सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था पाटण

पाटणकर सत्यजित विक्रमसिंह आणी देसाई शंभूराज शिवाजीराव यांच्यात लढत

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि. का.स सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था कोरेगांव

खत्री सुनिल रवेलचंद आणी माने सुनिल गुलाबराव यांच्यात लढत

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि.का.स सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था- खटाव

मोरे नंदकुमार उर्फ नानासो महादेव बिनविरोध

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि. का.स. सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था- माण

पोळ मनोजकुमार सदाशिवराव, गोरे शेखर भगवानराव आणी गोरे जयकुमार भगवानराव यांच्यात लढत.

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि.का.स सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था- खंडाळा

गाढवे शामराव लक्ष्मणराव, गाडवे संजीव शंकरराव आणी भोसले अजय केशव यांचेत लढत

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि.का.स सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था- वाई

बीर सत्यजीत सुरेश बिनविरोध

प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि.का.स सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था- फलटण

श्रीमंत नाईक निंबाळकर संजीवराजे विजयसिंह आणी नाईक निंबाळकर समशेर हिंदूराव यांचेत लढत

महिला राखीव प्रतिनिधी

पाटील ऋतुजा राजेश आणी पाटील मंगल चंद्रकांत यांचेत लढत

अनुसुचित जाती किंवा अनुसुचित जमाती सदस्य

चव्हाण दिपक प्रल्हाद आणी बडेकर रविंद्र सर्जेराव आणी गायकवाड सुरेश बबन व कांबळे सत्यवान आवाजी यांचेत लढत

इतर मागासवगीय सदस्य

पाचांगणे संदीप यशवंत, आणी फडतरे योगेश संभाजीराव यांचेत लढत

विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास वर्गीय सदस्य

वाघ सुनिल सुरेश आणी काळे अर्जुन चांगदेव यांचेत लढत

कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्था- खरेदी-विक्री संघ (तालुका व जिल्हा खरेदी-विक्री संघ)

जाधव (पाटील) मकरंद लक्ष्मणराव बिनविरोध

*कृषी उत्पादक व प्रक्रीया सहकारी संस्था (सहकारी साखर कारखाने ऑईल मिल्स्/सुतगिरण्या) यांचे प्रतिनिधी

भोसले अतुल सुरेश बिनविरोध

* नागरी बँका नागरी पतसंस्था/ग्रामीण बिगरशेती पतसंस्था/पगारदार नोकरांच्या पतसंस्था यांचे प्रतिनिधी

नाईक निंबाळकर रणजीतसिंह हिंदूराव

* गृहनिर्माण सहकारी संस्था व दुध उत्पादन संस्था पशुपैदास्/वराहपालन/कुक्कुटपालन शेळी मेंढी पालन संस्था

धुमाळ सोमनाथ रामचंद्र बिनविरोध

औदयोगिक/विणकर व मजूर सहकारी संस्था/ग्राहक संस्था / पाणीपुरवठा सहकारी संस्था/इतर प्रकारचे संस्था प्रतिनिधी/व्यक्तीगत सभासद

वाघ सुनिल सुरेश आणी जाधव चंद्रकांत माधवराव यांचेत लढत

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers