पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी, ता. १७ : सुरूर-पोलादपूर या महत्त्वाच्या राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांचे अतोनात हाल होत असून, या गंभीर समस्येवर पाचगणी गिरिस्थान नगर परिषद आक्रमक झाली आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था आणि संथ गतीने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाबाबत नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (एमएसआयडीसी) अधिकाऱ्यांना पालिका कार्यालयात बोलावून चांगलेच धारेवर धरले. लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांनी नमते घेत उद्यापासूनच खड्डे बुजविण्यास सुरुवात करून दिवाळीपूर्वी संपूर्ण रस्ता खड्डेमुक्त करण्याचे ठाम आश्वासन दिले आहे.
सुरूर ते पोलादपूर हा महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा राज्य मार्ग आहे. सध्या या मार्गाचे काँक्रिटीकरण एमएसआयडीसीच्या अधिपत्याखाली सुरू आहे. मात्र, कामाचा अत्यंत मंद वेग आणि ठिकठिकाणी पडलेले महाकाय खड्डे यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. पाचगणी शहर हद्दीतही हीच परिस्थिती असल्याने ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता?’ असा संतप्त सवाल नागरिक व पर्यटक विचारत आहेत. पर्यटनाचा हंगाम आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर या खड्ड्यांमुळे पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिक, दुचाकीस्वार आणि प्रवाशांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी घाटजाई शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घडवून आणली. या बैठकीत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीचे संचालक अथर्व सावजी यांच्यावर नगरसेवक नारायण बिरामणे आणि बांधकाम सभापती राजेंद्र पारठे यांनी प्रश्नांचा भडिमार केला. कामाचा खालावलेला दर्जा, खड्डे बुजविण्यास होणारा उशीर आणि सामान्य जनतेला सहन करावा लागणारा मनस्ताप यावरून अधिकाऱ्यांना निरुत्तर करण्यात आले.
यावेळी एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी न स्वीकारल्याने पालिका पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट घेऊन वरिष्ठ पातळीवर गारऱ्हाणे मांडण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला आहे. लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवसापासूनच खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करून दिवाळीपूर्वी हा मार्ग पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्यासह मुख्याधिकारी पंडित पाटील, घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष शेखर कासुर्डे, बांधकाम सभापती राजेंद्र पारठे, नगरसेवक नारायण बिरामणे, महेश खांडके आणि नगरपरिषदेचे अभियंता निखिल पवार यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.



