Home » पांचगणी » स्वरा एन्टरप्रायजेस व राजेंद्र शेठ राजपुरे युवा मंचाचा स्तुत्य उपक्रम; रुईघर, शिंदेवाडी व गणेशपेठ शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

स्वरा एन्टरप्रायजेस व राजेंद्र शेठ राजपुरे युवा मंचाचा स्तुत्य उपक्रम; रुईघर, शिंदेवाडी व गणेशपेठ शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी  : शिक्षणाशिवाय माणसाचा विकास अधुरा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्दीने व आत्मविश्वासाने शिक्षण घेतले पाहिजे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून स्वरा एन्टरप्रायजेसने आपल्या व्यवसायातील काही रक्कम वापरून दरवर्षी सातत्याने हा उपक्रम राबवून समाजासाठी खारीचा वाटा उचलण्याचे अत्यंत कौतुकास्पद काम केले आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा महाबळेश्वर तालुक्याचे नेते सहकारत्न राजेंद्र शेठ राजपुरे यांनी केले. मौजे रुईघर, ता. जावळी, जि. सातारा येथे आयोजित शालेय वह्या वाटपाच्या प्रेरणादायी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

​विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्वरा एन्टरप्रायजेसचे सर्वेसर्वा संदीप तुकाराम वाडकर व राजेंद्र शेठ राजपुरे युवा मंच महाबळेश्वर तालुका यांच्या संयुक्त वतीने जि. प. प्रा. शाळा गणेशपेठ, जि. प. प्रा. शाळा शिंदेवाडी आणि जि. प. प्रा. शाळा रुईघर येथील विद्यार्थ्यांना यावेळी शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठे प्रोत्साहन मिळाले असून पालक व शिक्षकांनी या स्तुत्य सामाजिक कार्याचे मनापासून स्वागत केले.

​सकाळी ठीक ११ वाजता कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उत्साही स्वागताने झाली. शाळेतील विद्यार्थिनींनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित मान्यवरांचे आदरपूर्वक स्वागत केले. या शानदार सोहळ्याला सहकारत्न राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीसह दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, सरपंच अंकुश बेलोशे, अॅड. सुहास भिलारे, तुकाराम वाडकर, विजय गावडे, योगेश पाटोळे (पाटोळे एन्टरप्राइज, वाघोली, पुणे), विकास जंगम, अजित बेलोशे, संदेश राजपुरे, विकास पवार, जितेंद्र मालुसरे, प्रकाश मालुसरे, अमर वाडकर आणि अमोल राजपुरे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.

​पुढे बोलताना राजेंद्र राजपुरे यांनी संदीप वाडकर यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, “संदीप वाडकर यांनी स्वतःच्या व्यवसायातील काही हिस्सा बाजूला काढून दरवर्षी असा स्तुत्य उपक्रम राबवणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. अशा सामाजिक दायित्वातून रुईघर, शिंदेवाडी आणि गणेशपेठसारख्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी मदत होते. विद्यार्थ्यांनी या मदतीचे सोने करून जिद्दीने शिकावे, मोठे अधिकारी व्हावे आणि आपल्या भागाचे नाव उज्ज्वल करावे.” त्यांच्या या मनोगताला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

​यावेळी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान शिक्षक सय्यद सर, सौ. वर्षा कदम आणि सौ. स्वाती नाडे मॅडम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

​कार्यक्रमाच्या शेवटी जि. प. प्रा. शाळा शिंदेवाडी यांच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्वरा एन्टरप्रायजेसचे श्री. संदीप वाडकर यांनी राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी मनःपूर्वक कौतुक केले असून, भविष्यातही असा सामाजिक वसा सातत्याने पुढे सुरू राहावा, अशी आग्रही अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers