Home » पांचगणी » हर घर तिरंगा’ अभियानाने पांचगणीत देशभक्तीचा उत्साह; भाजप पदाधिकाऱ्यांची बाजारपेठेत पदयात्रा आणि ध्वजवाटप

हर घर तिरंगा’ अभियानाने पांचगणीत देशभक्तीचा उत्साह; भाजप पदाधिकाऱ्यांची बाजारपेठेत पदयात्रा आणि ध्वजवाटप

पांचगणी न्यूज नेटवर्क 

पांचगणी : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभरात राबवल्या जाणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय अभियानाला पांचगणी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रध्वजाचे महत्त्व पटवून देत नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी आणि तिरंग्याचा सर्वोच्च सन्मान राखण्याचा संदेश देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पांचगणी शहरात विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले.

​पांचगणीच्या मुख्य बाजारपेठेतून कार्यकर्त्यांनी एक छोटीशी पदयात्रा काढून परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण केले. या मोहिमेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष दुकानांमध्ये आणि घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या जनजागृती दरम्यान प्रत्येक नागरिकाला व व्यापाऱ्याला ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मोफत राष्ट्रध्वज देऊन या राष्ट्रीय उत्सवात सहभागी करून घेण्यात आले.

​या प्रसंगी बोलताना भाजप महाबळेश्वर तालुका प्रमुख अनिल नाना भिलारे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “तिरंगा हा केवळ तीन रंगांचा ध्वज नसून तो आपल्या देशाची अस्मिता, एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे. प्रत्येक घरावर फडकणारा तिरंगा आपल्यातील देशभक्तीची ज्योत नेहमी तेवत ठेवेल.  १५ ऑगस्ट दरम्यान सर्व नागरिकांनी आपापल्या घरावर पूर्ण सन्मानाने, ध्वजसंहितेचे नियम पाळून तिरंगा फडकवावा आणि या मोहिमेत हिरीरीने सहभागी व्हावे.”

​या जनजागृती पदयात्रेत आणि ध्वजवाटप उपक्रमात भाजप महाबळेश्वर तालुका प्रमुख अनिल नाना भिलारे, संतोष कवी, अनिल बोधे, माधव बाचल, मोहन गोळे आणि चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते व व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे संपूर्ण पांचगणी बाजारपेठेत राष्ट्रप्रेमाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers