Home » मेढा » जावलीत सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा शानदार नागरी सत्कार; मेढा पोलीस आणि महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचा कौतुकास्पद उपक्रम

जावलीत सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा शानदार नागरी सत्कार; मेढा पोलीस आणि महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचा कौतुकास्पद उपक्रम

पांचगणी न्यूज नेटवर्क

मेढा : शासन, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि मजबूत दुवा म्हणून ‘पोलीस पाटील’ हे पद ओळखले जाते. गावाची शांतता, सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात आणि शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात पोलीस पाटलांचे योगदान नेहमीच अतुलनीय राहिले आहे, असे प्रतिपादन जावलीचे नायब तहसीलदार संजय बैलकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघ जावली तालुका आणि पोलीस स्टेशन मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील सेवानिवृत्त पोलीस पाटलांच्या भव्य सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मेढा येथील या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील मॅडम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंगटे साहेब यांची सन्माननीय उपस्थिती होती. याप्रवेळी तालुक्यातील पाच सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन अत्यंत भावुक आणि उत्साही वातावरणात गौरव करण्यात आला.

​कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील म्हणाले की, पोलीस पाटील पदावर कार्यरत असताना पोलिसांना नेहमीच मोलाचे सहकार्य लाभते. आगामी काळातही सर्व पोलीस पाटलांनी प्रशासनाला अशीच साथ द्यावी. चालू कार्यकाळात सर्वांनी निष्कलंक राहून आपली सेवा बजावावी आणि आज जे पोलीस पाटील सेवानिवृत्त होत आहेत, त्यांचा आदर्श समोर ठेवून सर्वांनी मार्गक्रमण करावे, असे आवाहन करत त्यांनी निवृत्त पोलीस पाटलांना पुढील आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात आपल्या प्रदीर्घ सेवेने गावाचा नावलौकिक वाढवणाऱ्या आलेवाडीचे विठ्ठल दत्तात्रय पिसाळ, नांदगणे येथील विष्णू तुकाराम दळवी, आंबेकर तर्फे मेढा येथील जगन्नाथ बाबुराव शेलार, काळोशीचे शशिकांत बळवंत शेलार आणि वाघळीचे सुरेश लक्ष्मण कदम या पाच सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा पोलीस स्टेशन आणि संघटनेच्या वतीने विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

​या ऐतिहासिक कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. अनिल निकम (पोलिस पाटील, करंदी) यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण प्रास्ताविकाने झाली. त्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्याची आणि संघटनेच्या भूमिकेची सविस्तर माहिती दिली. यानंतर तळोशीचे पोलीस पाटील संतोष चिकणे आणि तेटलीच्या पोलीस पाटील सौ. रेश्मा चव्हाण यांनी सन्मानपत्राचे अत्यंत प्रभावी व सुंदर वाचन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि निवेदन रुईघरचे पोलीस पाटील श्री. प्रवीण पवार यांनी केले, तर शेवटी पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष श्री. संजय कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

​हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जावली तालुक्यातील संघटनेचे उपाध्यक्ष नवसरे पाटील, संघटनेचे सचिव तथा कावडीचे पोलीस पाटील मानकुमरे, मुकवलीचे पाटील संजय पवार, कुंभारगणी पाटील, सांगवी पाटील, करंजे पाटील, संतोष दळवी (मोहट पाटील), इंदवलीचे पोलीस पाटील गायकवाड आणि आंबेघरचे पोलीस पाटील अनिल गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच खर्शीचे पोलीस पाटील श्री. सुहास भोसले आणि केडंबे पोलीस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

जावली तालुक्यातील सर्व महिला पोलीस पाटील, विविध गावचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा पोलीस पाटील बांधवांच्या एकतेचे आणि कर्तव्याप्रती असलेल्या आदराचे अनोखे प्रतीक ठरला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers