Home » वाई » पश्चिम भागाच्या शिरपेचात मानाचा तुरा; भाग्यश्री थोरवे पहिल्या महिला पोलीस अधिकारी

पश्चिम भागाच्या शिरपेचात मानाचा तुरा; भाग्यश्री थोरवे पहिल्या महिला पोलीस अधिकारी

 

पांचगणी न्यूज नेटवर्क 
वाई : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी कुटुंबातील एका कन्येने यशाचे शिखर गाठत वाई तालुक्याच्या पश्चिम भागाच्या इतिहासात मानाचा ठसा उमटवला आहे. व्याहळी कॉलनी येथील भाग्यश्री विद्या विजय थोरवे यांनी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठीचे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण वाई तालुक्याचा गौरव वाढवला आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पार पडलेल्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्यांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे, भाग्यश्री थोरवे यांनी वाई तालुक्यातील पश्चिम भागाच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी बनण्याचा मान मिळवला असून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या दीक्षांत संचलन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची भावना जपण्याचे आवाहन केले.

भाग्यश्री यांचे वडील विजय थोरवे व आई विद्या थोरवे हे दोघेही शेतकरी आहेत. अत्यंत साध्या परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, व्याहळी कॉलनी येथे, माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे तर बी.कॉम. पदवी किसनवीर महाविद्यालय, वाई येथून पूर्ण झाली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.कॉम. (अॅडव्हान्स अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन) ही पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादन केली.

स्पर्धा परीक्षांमध्येही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवत एमपीएससी २०२२ मधून पोलीस उपनिरीक्षक तसेच महसूल सहाय्यक २०२३ पदासाठी निवड मिळवली. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी शारीरिक क्षमता, शस्त्र हाताळणी, गुन्हे अन्वेषण, कायदा व सुव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्य यामध्ये प्राविण्य मिळवले.

भाग्यश्री यांचा धाकटा भाऊ भारतीय सैन्य दलात देशसेवा बजावत असून मोठा भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. देशसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि मेहनतीची परंपरा या कुटुंबात दिसून येते.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भावना व्यक्त करताना भाग्यश्री थोरवे म्हणाल्या, “शेतकरी कुटुंबातील मुलगी म्हणून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. आई-वडिलांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळेच हे यश मिळाले. पोलीस अधिकारी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे काम करणे हेच माझे ध्येय आहे.”
भाग्यश्री थोरवे यांचे यश हे केवळ एका व्यक्तीचे यश नसून ग्रामीण भागातील प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे त्यांनी जिवंत उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या या यशामुळे व्याहळी कॉलनीसह संपूर्ण वाई तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ, शिक्षक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम भागाला पहिली महिला पोलीस अधिकारी मिळाल्याने हा परिसरासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण ठरला आहे. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थिनींसाठी भाग्यश्री थोरवे यांची यशोगाथा प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers