पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर: निसर्गाचा अद्भूत चमत्कार आणि विहंगम सूर्योदय पाहण्यासाठी महाबळेश्वरमधील विल्सन पॉईंटवर (सनराईज पॉईंट) दररोज हजारो पर्यटक हजेरी लावतात. मात्र, हे ठिकाण सातारा वनविभागाच्या अधिपत्याखाली येत असून ते एक ‘राखीव वनक्षेत्र’ आहे. या भागातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यटनाला शिस्त लावण्यासाठी वनपरिक्षेत्र महाबळेश्वर आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती भेकवली यांच्या वतीने संयुक्त पावले उचलण्यात आली आहेत. मुख्य प्रेक्षणीय स्थळ वगळता पर्यटकांना सभोवतालच्या गाभा वनक्षेत्रात (कोअर फॉरेस्ट एरिया) प्रवेश करण्यास आता पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
सुर्यास्तानंतर प्रवेश बंद; हुल्लडबाजी करणाऱ्यांवर होणार थेट गुन्हा दाखल!
सुरक्षेचा उपाय म्हणून विल्सन पॉईंटचे मुख्य प्रवेशद्वार आता सूर्यास्तानंतर पूर्णपणे बंद केले जाईल आणि ते थेट दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळीच उघडले जाईल. त्यामुळे पर्यटकांनी मुख्य गेट बंद होण्यापूर्वीच आपली वाहने आवाराबाहेर काढून घेणे बंधनकारक आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी या शांत वनक्षेत्रात जाऊन पार्टी करणे, मद्यपान करणे किंवा मोठमोठ्याने गाणी वाजवून धिंगाणा घालण्याचे प्रकार समोर येत होते. या पार्श्वभूमीवर वनविभागाने स्पष्ट केले आहे की, वनक्षेत्रात पार्ट्या करणे, दारू पिणे किंवा हुल्लडबाजी करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर ‘भारतीय वनअधिनियम १९२७’ अंतर्गत कठोर फौजदारी कारवाई केली जाईल.
ड्रोन उडवण्यास आणि पाळीव प्राण्यांना आणण्यास सक्त मनाई!
अलिकडच्या काळात पर्यटकांमध्ये ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, ड्रोनच्या आवाजामुळे राखीव क्षेत्रातील वन्यप्राणी आणि पक्षी भयभीत होतात. हीच बाब लक्षात घेऊन विल्सन पॉईंट परिसरात ड्रोन उडवण्यावर आता सक्त बंदी घालण्यात आली आहे. नियम डावलून ड्रोन उडवल्यास तो थेट जप्त केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच, वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी आणि संभाव्य संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पर्यटकांना आपल्यासोबत पाळीव प्राणी (Pet Animals) घेऊन येण्यासही मनाई करण्यात आली आहे.
वन्यप्राण्यांना खाऊ घालू नका आणि प्लास्टिक कचरा टाळा!
अनेक पर्यटक हौस म्हणून येथील माकडे किंवा इतर वन्यप्राण्यांना चिप्स, बिस्किटे यांसारखे मानवी खाद्यपदार्थ टाकतात. अशा पदार्थांमुळे वन्यप्राण्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने त्यांना कोणतेही खाद्यपदार्थ न टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, संपूर्ण महाबळेश्वर प्रमाणेच या वनक्षेत्रातही प्लास्टिक कचरा टाकण्यास बंदी असून, पर्यटकांनी परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे सांगण्यात आले आहे.
वनविभागाचे आवाहन:
विल्सन पॉईंट हे निसर्गाचे लेणे असून त्याचे रक्षण करणे हे प्रत्येक पर्यटकाचे कर्तव्य आहे. सातारा वनविभाग आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती भेकवली यांच्या वतीने सर्व पर्यटकांचे महाबळेश्वरमध्ये मनापासून स्वागत आहे. परंतु, निसर्गाचा आस्वाद घेताना वनविभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, जेणेकरून कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार नाही.



