Home » कराड » कोयना पाणलोट क्षेत्रात वरुणराजाची दमदार बॅटिंग; धरणात प्रतिसेकंद २,३७७ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू! ​शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण; २४ तासांत महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ११३ मिमी पावसाची नोंद

कोयना पाणलोट क्षेत्रात वरुणराजाची दमदार बॅटिंग; धरणात प्रतिसेकंद २,३७७ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू! ​शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण; २४ तासांत महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ११३ मिमी पावसाची नोंद

पांचगणी न्यूज नेटवर्क

पाटण | : गेल्या चार दिवसांपासून पाटण शहरासह संपूर्ण तालुक्यात आणि कोयना धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. बळीराजासह संपूर्ण जिल्ह्याला ज्या पावसाची प्रतीक्षा होती, तो अपेक्षित पाऊस आता सुरू झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होऊ लागली आहे. सध्या कोयना धरणात प्रतिसेकंद सरासरी २ हजार ३७७ क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून मिळाली आहे.

​धरण क्षेत्रातील मुख्य ठिकाण असलेल्या कोयना, नवजा आणि महाबळेश्वर भागात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या २४ तासांतील (मंगळवार संध्याकाळी ५ ते बुधवार संध्याकाळी ५) पावसाची आकडेवारी पाहता, महाबळेश्वर येथे सर्वाधिक ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय कोयना येथे ४४ मिमी आणि नवजा येथे ७५ मिमी पाऊस पडला आहे. १ जूनपासून विचार केल्यास आतापर्यंत कोयना येथे १४० मिमी, नवजा येथे २१४ मिमी आणि महाबळेश्वर येथे १९३ मिमी एकूण पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

​चालू हंगामातील पावसाची अनिश्चितता आणि आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन धरण प्रशासनाकडून पाण्याचे चोख नियोजन केले जात आहे. सध्या कोयना धरणात एकूण १३.९७ टीएमसी तर उपयुक्त ८.८५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळातील पाणीटंचाई टाळण्यासाठी कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १०५० क्युसेक्स सोडण्यात येणारे पाणी आता केवळ दिवसातील १२ तास (अर्धा वेळ) सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, २४ तासांचा विचार करता प्रतिसेकंद सरासरी ५२५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.

कोयना धरणातील पाण्याची आवक समाधानकारक असली, तरी पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे नियोजन केले जात आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers