पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळत असल्याने समाजातील प्रत्येकाने रक्तदानाच्या कार्यात सहभागी व्हावे, असा संदेश पाचगणीत आयोजित रक्तदान शिबिरातून देण्यात आला. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पाचगणीतील बेबी पॉईंट परिसरातील ‘द पाचगणी क्लब’च्या सभागृहात युवा कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आणि बालाजी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन मॅप्रो फॅक्टरीचे चेअरमन मयूर व्होरा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पाचगणी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष स्वप्नील परदेशी, शाम चौरसिया, डॉ. राहुल सर्वोदे, प्रसाद कारंजकर, प्रमोद कासुर्डे तसेच बालाजी ब्लड बँकेचे राम भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा विशेष सन्मान करण्यात आला. रक्तदानानंतर सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे युवकांमध्ये रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बालाजी ब्लड बँकेचे वैद्यकीय पथक, स्वयंसेवक तसेच सर्व रक्तदात्यांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले. पाचगणीकरांनी दाखविलेल्या सामाजिक जाणीव आणि सेवाभावामुळे हे शिबिर यशस्वी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
समाजहिताच्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. शिबिरात एकूण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.



