Home » कराड » कराड बसस्थानक परिसरातील जबरी चोरीचा छडा; पती-पत्नी जेरबंद

कराड बसस्थानक परिसरातील जबरी चोरीचा छडा; पती-पत्नी जेरबंद

पांचगणी न्यूज नेटवर्क

कराड : बसस्थानक परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या पती-पत्नीच्या जोडीला कराड शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, या दोघांच्या अटकेमुळे कराड शहरातील जबरी चोरीच्या अन्य तीन गुन्ह्यांचाही पर्दाफाश झाला आहे.

​श्रावण राजेश कांबळे (३३) आणि पूनम श्रावण कांबळे (२७, दोघे रा. कराड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २२ जून रोजी रात्री नवग्रह मंदिर ते एसटी स्थानकादरम्यान एका महिलेला अडवून, जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी मंगळसूत्र हिसकावले होते. या घटनेनंतर कराड पोलिसांची पथके तातडीने कामाला लागली होती. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले.

​पोलिसांच्या चौकशीत या पती-पत्नीने कराड शहर परिसरात अशाच प्रकारे जबरी चोरीचे आणखी तीन गुन्हे केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सपोनि विजय गोडसे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली आहे. चोरट्यांच्या या टोळीने शहरात दहशत निर्माण केली होती, त्यांच्या अटकेमुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. उर्वरित मुद्देमालाचा शोध पोलीस घेत असून, अधिक तपास सुरू आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers