Home » पांचगणी » पांचगणीतील संजीवन विद्यालयाच्या राज्यस्तरीय रिंक फुटबॉल स्पर्धेत मुंबईच्या सेंट ऍन इंटरनॅशनल स्कूलला विजेतेपद : न्यू इरा हायस्कूला उपविजेतेपद

पांचगणीतील संजीवन विद्यालयाच्या राज्यस्तरीय रिंक फुटबॉल स्पर्धेत मुंबईच्या सेंट ऍन इंटरनॅशनल स्कूलला विजेतेपद : न्यू इरा हायस्कूला उपविजेतेपद

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : येथील प्रसिद्ध संजीवन विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १२ आणि १५ वर्षांखालील मुलांच्या दोन दिवसीय ‘राज्यस्तरीय रिंक फुटबॉल चॅम्पियनशिप-२०२६’ स्पर्धेचा समारोप अत्यंत उत्साही वातावरणात झाला. या स्पर्धेत मुंबईच्या सेंट ऍन इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दोन्ही वयोगटांत विजेतेपदावर आपले नाव कोरले आणि स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजविले. संजीवन विद्यालयाच्या अत्याधुनिक कृत्रिम ॲस्ट्रो टर्फ मैदानावर पार पडलेल्या या सामन्यांना क्रीडाप्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला.

 

​स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील १२ नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १२ वर्षांखालील गटात मुंबईच्या सेंट ऍन इंटरनॅशनल स्कूलने प्रथम क्रमांक मिळवला, तर पाचगणीच्या न्यू इरा हायस्कूलला उपविजेतेपदावर आणि विद्यानिकेतन हायस्कूलला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. १५ वर्षांखालील वयोगटात सेंट ऍन इंटरनॅशनल स्कूल मुंबईच्या ‘ब’ संघाने उपविजेतेपद पटकावले, तर नागपूरच्या ए ए आय फाउंडेशन ‘अ’ संघाने तिसरे स्थान मिळवले.

​वैयक्तिक कामगिरीमध्ये १२ वयोगटात सेंट ऍन स्कूलच्या रेगन कृष्णन याला सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर न्यू इरा हायस्कूलच्या आझाद पिंजारी याला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. १५ वर्षे वयोगटात सेंट ऍन स्कूलच्या अली शेख याने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा, तर नागपूरच्या ए ए आय फाउंडेशनच्या हार्दिक बोडके याने उत्कृष्ट गोलरक्षकाचा बहुमान मिळवला.

​या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मॅप्रो उद्योग समूहाचे प्रमुख मयूर व्होरा , संस्थेच्या अध्यक्षा शशीताई ठकार, संजीवन विद्यालय ट्रस्टच्या विशेष कार्यकारी विश्वस्त अनघा देवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी नगरसेवक प्रवीण बोधे, शरद ठकार, रविंद्र देशमुख, क्लॅरिस्टा डिसिल्वा, नेहा शहा, आकांक्षा बोंगाळे, पियुष शाह, पौर्णिमा पाटील, महेंद्र सावंत आणि फारुख शेख आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना क्रीडाभावना व शिस्त जपत उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

 

​संजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय शिरूर यांनी आपल्या भाषणात विद्यालयाने शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्राला नेहमीच प्राधान्य दिल्याचा पुनरुच्चार केला. या भव्य स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी विद्यालयाचे स्पोर्ट्स को-ऑर्डिनेटर सचिन कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. मैदानाची तयारी आणि सहभागी संघांचे व्यवस्थापन त्यांनी उत्तम रीतीने सांभाळले.

 

​स्पर्धेचे ओघवते समालोचन अक्षय जाधव व आकांक्षा बोंगाळे यांनी केले. संपूर्ण स्पर्धेत दत्ता सर व खताडे सर यांनी पंच म्हणून काम पाहिले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नेहा शाह यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले. या स्पर्धेत सेंट झेवियर्स हायस्कूल, सेंट पीटर्स स्कूल, ग्रीन व्हॅली हायस्कूल आणि महाबळेश्वरच्या अंजुमन इस्लाम हायस्कूलसह अनेक नामांकित शाळांनी भाग घेतला होता. या यशस्वी आयोजनामुळे संजीवन विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers