Home » पांचगणी » महाबळेश्वर तालुक्यात १००% अनुदानावर मका वैरण बियाणे वाटपाचा शुभारंभ; पशुपालकांना टॉनिकचेही मोफत वाटप!

महाबळेश्वर तालुक्यात १००% अनुदानावर मका वैरण बियाणे वाटपाचा शुभारंभ; पशुपालकांना टॉनिकचेही मोफत वाटप!

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : दुर्गम व डोंगराळ भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण मुख्यत्वे पशुपालनावर अवलंबून असते. हेच पशुधन अधिक सक्षम व्हावे आणि दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी, या उद्देशाने महाबळेश्वर तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तालुक्यात १०० टक्के अनुदानावर मक्याच्या वैरण बियाण्यांच्या वाटपाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. या स्तुत्य मोहिमेचा भव्य शुभारंभ राजपुरी (ता. महाबळेश्वर) येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरात विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

 

​पशुधनाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी मोफत मका बियाणे पुरविण्यात येते. यावर्षी ‘चारा समृद्ध गाव अभियानांतर्गत’ हा उपक्रम राबविला जात असून, उद्घाटनाच्या या कार्यक्रमास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, महाबळेश्वरच्या सभापती शकुंतला चोरमले, पंचायत समिती सदस्य वंदनाताई भिलारे, सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष महादेव दुधाणे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी राजपुरी, आंब्रळ, खिंगर या परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे बियाणे १०० टक्के शासकीय अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याने, यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला कोणतेही शुल्क किंवा पैसे द्यावे लागणार नाहीत. तालुक्यातील इच्छुकांनी केवळ मागणी अर्ज, सात-बारा उतारा आणि ओळख व पत्त्याच्या पडताळणीसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे जमा केल्यानंतर, उपलब्धतेनुसार बियाण्यांचे तात्काळ वाटप केले जात आहे. विशेष म्हणजे, या अभियानांतर्गत केवळ बियाणेच नव्हे, तर जनावरांचे आरोग्य उत्तम राहून दुग्धोत्पादन वाढावे यासाठी पशुपालकांना मोफत पशु टॉनिकचेही वाटप करण्यात आले, ज्याला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

“शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता पशुपालनाची जोड देऊन दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिक समृद्धी साधावी, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला बळ देण्यासाठी पंचायत समिती तसेच जिल्हा बँक सदैव कटिबद्ध आहे,” असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

​पशुसंवर्धन विभागाच्या या महत्त्वपूर्ण योजनेमुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी, खिंगर आणि आंब्रळ परिसरातील शेकडो पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला असून, यामुळे आगामी काळात तालुक्यात दुधाचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers