पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर/पोलादपूर: पोलादपूर–वाई–महाबळेश्वर–सुरूर या अत्यंत महत्त्वाच्या राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात पावसाच्या सुरुवातीलाच दरडींची टांगती तलवार कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील कुंभळवणे फाटा येथे मोठा मातीचा ओसरा कोसळला, तर कापडे–पायटा आणि रानकडसरी परिसरात झाडे व अवजड दगड थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी काही तास पूर्णपणे ठप्प झाली होती. ऐन पावसाळ्यात घाटात अडकून पडल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या घटनेची माहिती मिळताच पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, पोलादपूर पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने युती पातळीवर मदतकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने स्थानिक ठेकेदाराच्या जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील चिखल, माती, दगड आणि उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. अथक प्रयत्नांनंतर रस्त्यावरील अडथळे दूर करून टप्प्याटप्प्याने या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, मंगळवारी सायंकाळी वरंधकडसरी परिसरातही दगड कोसळल्याचे समोर आले, तर कुंभळवणे येथील मातीचा ढिगारा ओलांडताना दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून मोठी कसरत करावी लागली.
आंबेनळी घाट हा भौगोलिकदृष्ट्या गेली अनेक वर्षे तीव्र दरडप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. दरवर्षी पावसाळ्यात या संपूर्ण घाटमाथ्यावर दरडी कोसळणे, मातीचे ओसरे येणे आणि यामुळे होणाऱ्या भीषण अपघातांचे सत्र सुरूच असते. त्यातच यंदा या मार्गावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी डोंगरांचे कडे अनियंत्रितपणे कापण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याने हे डोंगर अधिक भुसभुशीत होऊन भविष्यात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती स्थानिक नागरिकांकडून आणि तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या २४ तासांत पोलादपूर येथे ६६ मिमी, प्रतापगड खोऱ्यात ४७ मिमी आणि महाबळेश्वर खोऱ्यात ३७ मिमी इतक्या मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा (मुसळधार पावसाचा) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेनळी घाटातील धोका अधिकच वाढला असून, घाटातून प्रवास करणाऱ्या सर्वच वाहनचालकांनी रात्रीचा प्रवास टाळावा आणि अत्यंत सावधगिरी बाळगूनच वाहने चालवावीत, असे जाहीर आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



