Home » महाबळेश्वर » निसर्गाच्या कुशीत जपला प्रामाणिकपणा! १.५ लाखांची रोकड अन् मोबाईल असलेली दिल्लीच्या पर्यटकाची बॅग महाबळेश्वर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली सुपूर्द

निसर्गाच्या कुशीत जपला प्रामाणिकपणा! १.५ लाखांची रोकड अन् मोबाईल असलेली दिल्लीच्या पर्यटकाची बॅग महाबळेश्वर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली सुपूर्द

पांचगणी न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर: थंड हवेचे ठिकाण म्हणून जगभरात ख्याती असलेल्या महाबळेश्वरच्या निसर्गसौंदर्यासोबतच येथील लोकांच्या प्रामाणिकपणाचा आणि माणुसकीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज वाहनतळावर १ लाख ५० हजार रुपयांची रोकड, मोबाईल आणि अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग गहाळ झालेल्या दिल्ली येथील पर्यटकाला महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ती सुरक्षितपणे परत करत प्रामाणिकपणाचा नवा आदर्श घालून दिला आहे.

​देशभरातून दररोज हजारो पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वरमध्ये हजेरी लावतात. दिल्ली येथून आलेले पर्यटक संतोष कुमार हे देखील पर्यटनाचा आनंद लुटत असताना, घाईगडबडीत त्यांची मौल्यवान वस्तू असलेली बॅग श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ परिसरात विसरली. या बॅगेत तब्बल दीड लाख रुपयांची रोकड, महागडा मोबाईल आणि महत्त्वाचे आयडी प्रूफ व कागदपत्रे होती. बॅग गहाळ झाल्याचे लक्षात येताच संतोष कुमार यांच्या पायाखालची वाळू सरकली होती.

​दरम्यान, वाहनतळावर कर्तव्य बजावत असताना नगरपरिषदेचे कर्मचारी प्रकाश वाडकर, अस्लम मानकर, टिकू वागदरे आणि नविलकर यांना ही बेवारस बॅग आढळून आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कर्मचाऱ्यांनी तात्काळ ती बॅग ताब्यात घेतली. बॅग उघडून पाहिली असता त्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, मोबाईल व कागदपत्रे असल्याचे दिसून आले. कसलाही हावभाव न ठेवता किंवा पैशांचा मोह न बाळगता कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता बॅगेतील कागदपत्रे व मोबाईलच्या आधारे पर्यटकाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

​कर्मचाऱ्यांनी शिताफीने संपर्क साधून संतोष कुमार यांना बोलावून घेतले आणि त्यांची सर्व रोकड व सामान जसेच्या तसे सुरक्षितपणे त्यांच्या स्वाधीन केले. हरवलेली बॅग आणि त्यातील दीड लाखांची रोकड सुरक्षित पाहून संतोष कुमार अत्यंत भावुक झाले. त्यांनी महाबळेश्वरच्या या कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

​पर्यटननगरीत रोज होणाऱ्या गर्दीत दीड लाखांची रोकड मिळूनही ती प्रामाणिकपणे मालकापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रकाश वाडकर, अस्लम मानकर, टिकू वागदरे आणि नविलकर यांच्या या सत्कृत्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या घटनेमुळे महाबळेश्वरची ओळख केवळ निसर्गाने नटलेली भूमी म्हणूनच नाही, तर माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपणारी भूमी म्हणूनही अधोरेखित झाली आहे. नगरपरिषद प्रशासनाने अशा तत्पर आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers