पांचगणी न्यूज नेटवर्क
वाई : शहरातील धार्मिक स्थळे, कृष्णा नदीचे घाट, ऐतिहासिक पसरणी घाट आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धुडगूस घालणाऱ्या तळीरामांविरोधात वाई पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून बाटल्या फोडणे, कचरा करणे आणि भाविक व नागरिकांना अश्लील शिवीगाळ करून त्रास देणाऱ्या १२ मद्यप्यांची थेट वाई पोलीस ठाण्याच्या दारात वरात काढत पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई केली. या कारवाईमुळे वाई शहरातील मद्यपी व हुल्लडबाजांचे धाबे दणाणले आहेत.
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरातील मंदिरांच्या पाठीमागील परिसर, कृष्णा नदीकाठचे पवित्र घाट, पसरणी घाटातील कट्टे, परखंदी रोड आणि स्मशानभूमीच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून मद्यप्यांचा उपद्रव वाढला होता. या मद्यपींमुळे स्थानिक नागरिक, महिला व भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या समस्येचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी वाई व पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी १ सप्टेंबर रोजी या उपद्रवी इसमांचा बंदोबस्त करण्यासाठी एक विशेष मोहीम आखली.
या मोहिमेअंतर्गत वाई पोलीस ठाण्याची चार विशेष पथके आवश्यक त्या लवाजम्यासह शहरातील प्रमुख संवेदनशील ठिकाणी एकाच वेळी रवाना झाली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोड आणि विविध स्मशानभूमींच्या परिसरात एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन नागरिकांना त्रास देणाऱ्या व शिवीगाळ करणाऱ्या १२ इसमांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या सर्व १२ जणांना तात्काळ पोलीस ठाण्यात आणून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार (गुन्हा रजिस्टर नंबर २५६ ते २६२/२०२६) गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात आली.
ही धडक कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस अंमलदार धीरज भोसले, उमेश लोखंडे, प्रसाद दुदुस्कर, राम कोळी, गोरख दाभाडे, विक्रम धोत्रे, नितीन कदम, हेमंत शिंदे, विशाल शिंदे व होमगार्ड अभिजीत येवले यांच्या पथकाने केली. वाई पोलिसांनी राबवलेल्या या विशेष मोहिमेचे आणि धडक कारवाईचे शहरातील शांतताप्रिय नागरिक व भाविकांमधून जोरदार स्वागत होत आहे.



