Home » महाबळेश्वर » महाबळेश्वर तालुक्यात खळबळ: पार गावात भरदिवसा घरफोडी; अंगणवाडी सेविकेच्या बंद घरातून २ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!

महाबळेश्वर तालुक्यात खळबळ: पार गावात भरदिवसा घरफोडी; अंगणवाडी सेविकेच्या बंद घरातून २ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!

पांचगणी न्यूज नेटवर्क

​प्रतापगड – महाबळेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक पार गावात भरदिवसा घरफोडीची एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप आणि कोयंडा तोडून घरात प्रवेश करत, कपाटातील तब्बल दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही चोरी एका अंगणवाडी सेविकेच्या घरात झाली असून, या धाडसी चोऱ्यांच्या सत्रामुळे संपूर्ण महाबळेश्वर आणि प्रतापगड परिसरात घबराट पसरली आहे. याप्रकरणी सुष्मा सुधाकर महामुनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाबळेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुष्मा महामुनकर या गेल्या २३ वर्षांपासून पार येथील अंगणवाडीत सेविका म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी त्यांचे पती नेहमीप्रमाणे ८.४० वाजण्याच्या सुमारास प्रतापगड माची येथील हस्तकला केंद्रात कामासाठी निघून गेले. त्यानंतर सकाळी १० वाजता सुष्मा महामुनकर या देखील घराला कुलूप लावून अंगणवाडीत गेल्या होत्या. घर बंद असल्याचे पाहून पाळत ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेतला.

​दुपारी १.२० वाजण्याच्या सुमारास सुष्मा महामुनकर या घरी परतल्या. मात्र, घराच्या मुख्य दरवाजाजवळ जाताच त्यांना दरवाजाचा कोयंडा तुटलेला आणि कुलूप केवळ नावापुरते अडकवून ठेवलेले दिसले. यामुळे घाबरलेल्या सुष्मा यांनी तातडीने शेजाऱ्यांना बोलावून घेतले आणि घरात प्रवेश केला. आत जाऊन पाहिले असता बेडरूममधील पत्र्याच्या कपाटाचे दार उचकटलेले होते आणि आतील लॉकर चोरांनी फोडले होते. लॉकरमधील दागिन्यांची पेटी तपासली असता, त्यातील सर्व सोन्याचे दागिने गायब झाल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

 

​चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये ८० हजार रुपये किमतीचे १ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ८० हजार रुपये किमतीची १ तोळे वजनाची सोन्याची कर्णफुले व वेल, आणि ४० हजार रुपये किमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, अशा एकूण २ लाख रुपयांच्या मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे. कष्टाच्या कमाईतून केलेले दागिने चोरीला गेल्याने महामुनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

​या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५ (अ) व ३३१ (४) अन्वये गुन्हा क्रमांक ६०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या धाडसी घरफोडीचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने करत आहेत.

 

​शांत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात, भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या सराईत चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकाव्यात आणि परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी तीव्र मागणी आता पार गावच्या नागरिकांमधून होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers