पाचगणी, न्यूज नेटवर्क
पांचगणी : गेल्या दोन दिवसांपासून पाचगणी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी मध्यरात्री टेबल लँड नाका येथे मंडल अधिकारी कार्यालयाच्या आवारतील एक झाड अचानक रस्त्यावर कोसळले. हे झाड थेट ‘कार्तिकस्वामी ऑटोमोबाईल’ आणी शेतकरी चहा या या दुकानावर आणि रस्त्याच्या मध्यभागी आडवे पडल्याने टेबल लँडकडे जाणारा मुख्य मार्ग काही काळ पूर्णपणे ठप्प झाला होता. मध्यरात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर पादचारी किंवा वाहने नव्हती, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळी पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले. कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या तातडीने कापून रस्ता मोकळा करण्यात आला आणि काही तासांतच वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली. दरम्यान, पावसाळ्यात शहरातील अशा जुन्या व धोकादायक झाडांची प्रशासनाने तातडीने पाहणी करून त्यांची छाटणी करावी, अशी तीव्र मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.



