पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : “सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले ‘कित्तूरकर डेंटल क्लीनिक’ पाचगणीच्या वैभवात मोलाची भर घालणारे आहे. भविष्यात डॉ कित्तूरकर यांच्यामुळे हे पर्यटन स्थळ केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर दर्जेदार दातांच्या उपचारांसाठीही देशभरात नावारूपाला येईल,” असा ठाम विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी व्यक्त केला.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील प्रसिद्ध दंततज्ज्ञ डॉ. अमर कित्तूरकर यांच्या अत्याधुनिक डेंटल क्लीनिकचे नव्या वास्तूत स्थलांतर करण्यात आले . या नूतन वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, नगराध्यक्ष दिलीप बगाडे, आघाडी प्रमुख शेखर कासुर्डे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, अफझल भाई सुतार, जिल्हा परिषद सदस्य संजय केळगने, सभापती शकुंतला चोरमले, प्रवीण भिलारे, महादेव दुधाणे,अरविंद कित्तूरकर यांच्यासह पाचगणी-महाबळेश्वर नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, परिसरातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले, “पूर्वी दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जायचे. मात्र, शरीराच्या आरोग्याइतकेच दातांचे आरोग्यही अतिशय महत्त्वाचे आहे. ९० ते १०० वर्षे दीर्घायुष्य लाभलेल्या व्यक्तींचे दात ९९ टक्के चांगले असतात. दात केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर चेहऱ्याच्या मोहक सौंदर्यासाठीही महत्त्वाचे आहेत. डॉ. कित्तूरकर यांनी २० वर्षांपूर्वी या पाचगणीत अवघ्या १२० स्क्वेअर फुटांच्या छोट्या ओपीडीतून सुरुवात केली होती. आज त्यांच्या प्रामाणिक रुग्णसेवेमुळेच या भव्य क्लिनिकचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.” गडहिंगल्ज, कोल्हापूरची कौटुंबिक व व्यावसायिक पार्श्वभूमी असतानाही डॉ. कित्तूरकर यांनी रुग्णसेवेसाठी पाचगणीची निवड केली, याचे त्यांनी कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. अमर कित्तूरकर भावूक झाले. ते म्हणाले, “माझा भाऊ संजीवन स्कूलमध्ये शिकत असताना, मलाही येथे शाळेत घालणार होते. तेव्हा मी नकार दिला होता; पण तोच नकार आज मला पाचगणीत स्थिरस्थावर करण्यासाठीचा देवाची भेट ठरला. पाचगणीत काहीतरी मोठे करण्याचे माझे स्वप्न होते. येथील जनतेने मला जे प्रेम आणि विश्वास दिला, त्याच शिदोरीवर आज हा वटवृक्ष उभा राहिला आहे. हे यश माझे नसून पाचगणीकरांच्या विश्वासाचे आहे.”
प्रास्ताविकात राजेंद्रशेठ राजपुरे यांनी, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाचगणीत असे अद्ययावत हॉस्पिटल उभे राहिल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. पाचगणी ही जशी शिक्षणाची पंढरी आहे, तसेच हे क्लिनिक आता आरोग्य क्षेत्रात शहराचे नाव उंचावेल, असे सांगितले.
या सोहळ्याला वास्तुविशारद गणेश जावीर, डॉ. तेजस्विनी भिलारे, विठ्ठल दुधाणे, नगरसेवक नारायण बिरामणे, राजेंद्र पारठे, राजश्री सणस, परवीन मेमन, सुप्रिया माने, स्वाती कांबळे, नंदिनी बुटाला तसेच इतर नगरसेवक, नगरसेविका, प्रवीण बोधे, महाबळेश्वर, पाचगणी आणि परिसरातील रुग्णांनी व हितचिंतकांनी तसेच त्यांच्या कुटीबीयांनी मोठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. डॉ. स्मिता कित्तूरकर यांनी मानले.
…आणि कोल्हापूरचा ‘डॅशिंग डॉक्टर’ पाचगणीकर झाला!
डॉ. अमर कित्तूरकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कोल्हापूरची. त्यांच्या आजोबांनी सुरू केलेला ऑईल मिलचा मोठा व्यवसाय आणि वडिलांचा पेट्रोल पंपाचा व्यवसाय, अशी भक्कम आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा असतानाही डॉ. अमर यांनी व्यवसायाऐवजी वैद्यकीय क्षेत्राची वाट निवडली. त्यांनी कर्नाटकातून ‘BDS’ आणि त्यानंतर थेट रशियातून उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
विशेष म्हणजे, बालपणात त्यांचा भाऊ पाचगणीच्या प्रसिद्ध संजीवन स्कूलमध्ये शिकत असताना, डॉ. अमर यांनाही तिथे प्रवेश घेण्यास सांगण्यात आले होते; मात्र त्यांनी तेव्हा पाचगणीला येण्यास नकार दिला होता. नियतीचा खेळ बघा, ज्या पाचगणीला त्यांनी बालपणात नकार दिला, त्याच पाचगणीने त्यांना गेली २० वर्षे इतके भरभरून प्रेम दिले की, आज ते कायमचे ‘पाचगणीकर’ झाले आहेत. अवघ्या १२० चौरस फुटांच्या छोट्या खोलीतून सुरू झालेला हा प्रवास आज एका भव्य आणि अद्ययावत दंत रुग्णालयापर्यंत पोहोचला आहे.



