Home » पांचगणी » वाढदिवसाचे औचित्य साधत संभाजी भिलारे गुरुजींचा डिजिटल साक्षरतेचा ध्यास; ५० गरजू विद्यार्थ्यांना मोफत ‘MS-CIT’ चे बळ!

वाढदिवसाचे औचित्य साधत संभाजी भिलारे गुरुजींचा डिजिटल साक्षरतेचा ध्यास; ५० गरजू विद्यार्थ्यांना मोफत ‘MS-CIT’ चे बळ!

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : सध्याच्या आधुनिक युगात संगणक साक्षरता ही काळाची गरज बनली आहे; मात्र ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अनेकदा या संधींपासून वंचित राहावे लागते. हीच सामाजिक जाणीव ठेवून शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा माजी केंद्रप्रमुख संभाजी भिलारे गुरुजी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील ५० गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत ‘MS-CIT’ संगणक अभ्यासक्रम देण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. दरवर्षी वाढदिवसाला नाहक खर्च न करता गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ देण्याची गुरुजींची ही परंपरा यंदाही कायम राहिली असून, त्यांच्या या दातृत्वामुळे ५० विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी झाली आहे.

 

​पाचगणी येथील ‘अश्वटेक कॉम्प्युटर अकॅडमी’ मध्ये हा अनोखा वाढदिवस सोहळा व मोफत कोर्स वितरण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. आजच्या डिजिटल क्रांतीच्या काळात ग्रामीण भागातील प्रत्येक मूल तंत्रज्ञानाशी जोडले गेले पाहिजे, या उद्देशाने राबवण्यात आलेला हा उपक्रम इतर राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

​या सोहळ्यास महाबळेश्वरचे शिक्षक नेते प्रकाशराव मोरे गुरुजी, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुरेंद्र भिलारे गुरुजी, शिवसेना नेते संभाजीराव जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक जी. के. आंब्राळे आणि माजी शिवसेना तालुकाप्रमुख राम जाधव शेठ, भाजप सातारा उपाध्यक्ष तानाजीराव भिलारे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

​त्याचप्रमाणे शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रविण भिलारे, भिलारचे शाखाप्रमुख अशोक भिलारे, पश्चिम विभाग प्रमुख गणेश पांगारे, ज्येष्ठ शिवसैनिक आनंद पवार, कासवंडचे शाखाप्रमुख प्रतीक पवार, दानवलीचे शाखाप्रमुख विजय दानवले, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब वाडकर, अनिल पांगारे, शिवसेना नेते प्रदिप भिलारे, पाचगणी परिसरातील उद्योजक विशाल दुधाणे, संजय रोखडे, भाजप नेते संतोष धनावडे आणि अश्वटेक कॉम्प्युटर अकॅडमीचे संचालक सुरेश विष्णू मालुसरे आदी मान्यवर विशेषत्वाने उपस्थित होते.

​कार्यक्रमा दरम्यान अकॅडमीच्या शिक्षिका मृणाली बिरामने, मेहरुलीसा खान, निरुती खरात, दिशा शेलार, श्रावणी धनावडे आणि प्रिया पराठे यांनी भिलारे गुरुजींच्या शैक्षणिक, सामाजिक व पक्षीय क्षेत्रातील मोलाच्या योगदानाचा गौरव करत मनोगत व्यक्त केले.

​सदर कार्यक्रमाचे नेटके व उत्कृष्ट सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने सर यांनी केले. राजकीय आणि सामाजिक वर्तुळात भिलारे गुरुजींच्या या स्तुत्य व शैक्षणिक क्रांती घडवणाऱ्या उपक्रमाचे कौतुक होत असून, संपूर्ण महाबळेश्वर-पाचगणी परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers