पांचगणी न्यूज नेटवर्क / प्रमोद रांजणे
पाचगणी : विद्यार्थ्यांची सुरक्षा, शिस्त, मानसिक आरोग्य आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून बालकांचे रक्षण करण्यासाठी पाचगणी पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि डॉर्म प्रभारींची विशेष बैठक पार पडली. सुमारे ५० प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पोलीस प्रशासनाने विद्यार्थी सुरक्षेबाबत अत्यंत कडक आणि स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत.
बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) दिलीप पवार यांनी ‘गुड टच – बॅड टच’ या संवेदनशील विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींच्या कोणत्याही तपासणीच्या वेळी महिला शिक्षिकेची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून पुरुष शिक्षकांनी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थिनींना स्पर्श टाळावा, असे स्पष्ट बजावण्यात आले आहे. तसेच गृहपाठ न केल्यास वा शिस्तभंग झाल्यास मुलांना शारीरिक शिक्षा न देता समुपदेशनाद्वारे त्यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणावेत, असे सांगण्यात आले.
वसतिगृहांच्या सुरक्षेबाबत बोलताना, विद्यार्थ्यांना बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली असून मुलांकडे मोबाईल ठेवण्यास सक्त मनाई केली आहे. रात्रीच्या वेळी प्रत्येक विद्यार्थी सुरक्षित आहे का आणि त्याच्यावर कोणताही मानसिक दबाव किंवा छेडछाड होत नाही ना, याची नियमित खात्री करण्याचे निर्देश हॉस्टेल प्रभारींना देण्यात आले आहेत. शाळा व हॉस्टेल परिसरात तंबाखू, मद्य व अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जाणार आहे.
याशिवाय शाळा परिसरात ३० दिवसांच्या फुटेज बॅकअपसह कार्यरत सीसीटीव्ही, रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक, अँटी रॅगिंग समिती, तक्रार निवारण कक्ष आणि अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सायबर फसवणूक किंवा डिजिटल अरेस्टसारख्या प्रकारांबाबत जनजागृती करत कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले. पोलीस उपनिरीक्षक (PSI) बाळाजी सोनवणे यांनी मुलांमधील चिडचिड आणि मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी दररोज व्यायाम, योग आणि खेळांचे आयोजन करण्याचा सल्ला दिला.
”विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शाळा व वसतिगृहाने कोणतीही गंभीर घटना लपवून न ठेवता तात्काळ पोलिसांशी समन्वय साधावा.”
— दिलीप पवार (API, पाचगणी पोलीस ठाणे)



