पांचगणी न्यूज नेटवर्क
कराड : देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता कराडमध्येही उमटले. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देत शुक्रवारी कराडातील महाविद्यालयीन युवक, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन युवक युवती विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली.
यावेळी युवक युवतींनी “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “पेपरफुटी थांबवा”, “शिक्षण व्यवस्थेचे राजकारण बंद करा”, “आई माझा पेपर हरवला तो चोरला”, “इंकलाब जिंदाबाद, भारत माता की जय, शिक्षणमंत्री राजीनामा द्या,” अशा युवक युवतींनी दिलेल्या घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कराडात शुक्रवारी युवकांनी केलेल्या एक दिवसीय आंदोलनात एका आंदोलकाने ‘आपण कुणालाच घाबरत नाही’ या अशोक सराफ यांनी म्हंटलेल्या डायलॉगचे पोस्टर बनवून आणले होते. आंदोलनस्थळी असलेल्या या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कराडात शुक्रवारी युवक- युवकांनी केलेल्या एक दिवसीय आंदोलनस्थळी कराडातील वकिलांनी हजेरी लावत पाठिंबा दर्शवला. यावेळी पाठिंब्याचे पात्र देखील आंदोलकांना वकिलांच्या वतीने देण्यात आले. कराडात युवक युवतींनी केलेल्या आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलन केलेल्या सहकार्याबद्दल अणोदक युवक युवतींनी कराडच्या पोलिसांचे अभिनंदन देखील केले.



