Home » महाबळेश्वर » महाबळेश्वर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: ३.२२ लाखांचे १४ मोबाईल अन्‌ २.२५ लाखांची ऑनलाईन फसवणुकीची रक्कम मूळ मालकांना सुपूर्द

महाबळेश्वर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: ३.२२ लाखांचे १४ मोबाईल अन्‌ २.२५ लाखांची ऑनलाईन फसवणुकीची रक्कम मूळ मालकांना सुपूर्द

पांचगणी न्यूज नेटवर्क 

महाबळेश्वर : पर्यटनाची राजधानी असलेल्या महाबळेश्वर शहरात आणि परिसरातून नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल आणि ऑनलाईन सायबर भामट्यांनी लांबवलेली लाखोंची रक्कम शोधून काढण्यात महाबळेश्वर पोलीस ठाण्याला मोठे यश आले आहे. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या अत्यंत चिकाटीच्या तांत्रिक तपासामुळे तब्बल ३ लाख २२ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल आणि ऑनलाईन फ्रॉडमधील २ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि धडाकेबाज कामगिरीमुळे नागरिक आणि पर्यटकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

​महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत नागरिकांचे आणि पर्यटकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हर्षद गालिंदे यांना विशेष मोहीम राबवून गहाळ मोबाईलचा शोध घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.

​या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी तातडीने सूत्रे हलवली. केंद्र सरकारच्या ‘CEIR PORTAL’ चा प्रभावी वापर करत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईलचा मागोवा घेण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांत वापरत असलेल्या लोकांसी सातत्याने संपर्क साधून, अत्यंत कौशल्याने आणि चिकाटीने तब्बल १४ मोबाईल हस्तगत करण्यात आले. या हस्तगत मोबाईलची एकूण किंमत सुमारे ३ लाख २२ हजार रुपये आहे.

​याचसोबत सायबर गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी ‘NCRB PORTAL’ वर आलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात आली. ऑनलाईन फ्रॉडचा शिकार ठरलेल्या ५ तक्रारदारांच्या प्रकरणांचा जलद गतीने तांत्रिक तपास करून त्यांची तब्बल २ लाख २५ हजार रुपयांची फसलेली रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले.

​पोलीस ठाण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात मोबाईल आणि ऑनलाईन फ्रॉडची रक्कम मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आली. आपली हरवलेली वस्तू आणि कष्टाचे पैसे सुरक्षितपणे परत मिळाल्याने नागरिकांनी महाबळेश्वर पोलिसांचे मनापासून आभार मानले.

​यापुढील काळातही अशा प्रकारची शोध मोहीम महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने सातत्याने राबवली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ही संपूर्ण यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली काळे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव भिलारे, शंकर गलांडे आणि बाळू भागरे यांच्या पथकाने केली आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers