Home » पांचगणी » पाचगणीतील टेबललँडवर हरित क्रांतीचा ध्यास! गुहेतील कर्मचारी, वनविभाग अन् पर्यटकांच्या संयुक्त पुढाकारातून ‘सीडबॉल’ अभियान यशस्वी

पाचगणीतील टेबललँडवर हरित क्रांतीचा ध्यास! गुहेतील कर्मचारी, वनविभाग अन् पर्यटकांच्या संयुक्त पुढाकारातून ‘सीडबॉल’ अभियान यशस्वी

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : निसर्गाची मुक्त उधळण लाभलेल्या पाचगणी येथील जगप्रसिद्ध टेबललँड पठारावर पर्यावरण संवर्धनाची एक नवी आणि अतिशय स्तुत्य गुंफण पाहायला मिळाली. टेबललँडवरील प्रसिद्ध प्राचीन गुहा परिसरातील जंगलात असलेल्या ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पायवाटेच्या दुतर्फा हरित संवर्धनाचा संदेश देण्यासाठी गुहेतील कर्मचारी, वनविभाग आणि पर्यटकांनी एकत्र येत भव्य ‘सीडबॉल’ अभियान यशस्वीरीत्या राबवले. प्रत्यक्ष कृतीतून निसर्गरक्षणाचा वसा घेणाऱ्या या अभियानाचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

 

​टेबललँड हे पाचगणीचे मुख्य आकर्षण असल्याने दररोज हजारो पर्यटक या पठाराला भेट देतात. मात्र, पर्यटनाच्या ओघात निसर्गाचा समतोल बिघडू नये आणि सभोवतालच्या जैवविविधतेचे रक्षण व्हावे, या उद्देशाने गुहेतील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. गुरेघर वनपरिक्षेत्रातील वनपाल सुनील कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पायवाटेच्या दुतर्फा विविध प्रकारच्या देशी वृक्षांच्या बियांचे ‘सीडबॉल’ टाकून संपूर्ण परिसरात हिरवाई फुलवण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

​या अभियानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पठाराची सफर करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनीही यामध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतला. गुहेतील कर्मचारी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पर्यटकांनी स्वतः हाताने सीडबॉल टाकून पर्यावरण संवर्धनाची आपली सामाजिक जबाबदारी स्वीकारली. केवळ निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी श्रमदानात आणि बीजारोपणात घेतलेला हा सहभाग या मोहिमेला एक वेगळीच उंची देऊन गेला.

 

​या अभियानामुळे येत्या पावसाळ्यात या दुर्गम आणि जंगल परिसरात नैसर्गिकरीत्या हजारो वृक्षांची वाढ होण्यास मदत होणार असून, येथील जैवविविधतेचे रक्षण होण्यास मोठे बळ मिळणार आहे. केवळ औपचारिक घोषणा न देता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी जोरदार स्वागत केले. तसेच निसर्गाचे मूळ सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी वनविभाग व स्थानिक कर्मचाऱ्यांनी अशा मोहिमा सातत्याने राबवाव्यात, अशी भावना या वेळी पर्यटकांनी व्यक्त केली.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers