पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ समाजसेवक, कवी व पत्रकार अरुण सखाराम मालुसरे यांच्या बहुआयामी कार्याचा मुंबईत राज्यस्तरीय सोहळ्यात गौरव करण्यात आला. शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा मानाचा ‘सर्वोत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार-२०२६’ अरुण मालुसरे यांना मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला.
दादर (पूर्व) येथील ऐतिहासिक मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध सिनेअभिनेते गणेश यादव यांच्या हस्ते मालुसरे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या भव्य सोहळ्यास खासदार वर्षाताई एकनाथ गायकवाड, मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक डॉ. सुकृत खांडेकर, महाराष्ट्र विधानमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आणि शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. सुनील भार्गवराम शिर्के यांच्यासह विविध क्षेत्रांतील सनदी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अरुण मालुसरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. ‘मी मराठी’, ‘मुंबई पत्रकार संघ’ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचे आजीव सदस्य असण्यासोबतच त्यांनी ‘पोलीस तपास’ या साप्ताहिकाचे क्राईम रिपोर्टर म्हणून अत्यंत निष्पक्षपणे कार्य केले आहे. लेखक, कवी, पत्रकार आणि समाजसेवक या सर्व भूमिकांमधून त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी आणि समाजहितासाठी निरंतर कार्य केले आहे. त्यांच्या याच निस्वार्थ सेवेची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना मान्यवरांनी मालुसरे यांच्या प्रदीर्घ सामाजिक योगदानाचा आणि निरपेक्ष सेवाभावाचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या कार्यातून नवोदित पत्रकारांना व सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असून, भविष्यातही त्यांच्या हातून अशीच देश-समाजसेवा घडत राहो, अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अरुण मालुसरे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



