पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पाचगणी-महाबळेश्वर या मुख्य पर्यटन मार्गावर भोसे हद्दीत नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या अत्यंत निकृष्ट व ढिसाळ कामाचा गंभीर फटका आज सकाळी दुचाकीस्वारांना बसला. एकाच ठिकाणी अवघ्या काही वेळेच्या अंतराने तीन वेगवेगळ्या दुचाकी घसरून भीषण अपघात झाले. या विचित्र अपघातांमध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले असून, दानवली येथील दुचाकीस्वार कुणाल महादेव दानवले हे दुचाकीसह थेट मोठ्या ट्रकखाली गेल्याने अत्यंत थरारक प्रसंगात बालबाल बचावले. या सलग अपघातांमुळे या रस्त्याच्या दर्जावर आणि प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
पाचगणी-महाबळेश्वर रस्त्याचे वादग्रस्त काम गेल्या अनेक दिवसांपासून धुमसत असून, ठेकेदाराच्या धिम्या कारभारामुळे आधीच सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटन यंत्रणा त्रस्त आहेत. भोसे खिंड ते मनामा फॅक्टरी गेटदरम्यान नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता करण्यात आल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचा पृष्ठभाग असमान, खाली-वर झाला असून काही ठिकाणी डांबरीकरण अर्धवट सोडण्यात आले आहे. याच अचानक आलेल्या उंचवट्यांमुळे आणि घसरड्या रस्त्यामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघातांची मालिका सुरू झाली आहे.
आज सकाळी या धोकादायक वळणावर गाड्या घसरून सलग तीन दुचाकींचे विचित्र अपघात झाले. कुणाल दानवले हे आपल्या दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील घसरणीमुळे त्यांची गाडी थेट समोरून येणाऱ्या एका मोठ्या ट्रकच्या खाली आली. सुदैवाने ट्रकचा वेग अतिशय कमी असल्याने आणि उपस्थितांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दानवले यांच्यासह इतर जखमींना स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एकाच ठिकाणी काही मिनिटांच्या फरकाने घडलेल्या या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या महामार्गावर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रोज प्रवाशांचे बळी जाण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. ठेकेदाराच्या अनागोंदी कारभारामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून दोषींवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.



