Home » शिरवळ » शिरवळजवळ महामार्गावर थरारक अपघात: कारचा चक्काचूर; ३ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मृतदेह काढले बाहेर, ४ ठार

शिरवळजवळ महामार्गावर थरारक अपघात: कारचा चक्काचूर; ३ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मृतदेह काढले बाहेर, ४ ठार

पांचगणी न्यूज नेटवर्क

​शिरवळ : पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-बेंगळुरू महामार्गावर शिरवळ गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा थरार घडला.

​मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने भरधाव वेगात चाललेली कार (क्र. MH-14-LJ-3033) शिरवळ हद्दीत आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. कार महामार्गावरील रस्ता दुभाजकाला जोरदार धडकून तीन ते चार वेळा पलटी झाली आणि दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या मालट्रकला (क्र. KA-27-C-5878) धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.

​या अपघातात कारमधील वेदांत अर्जुन वारिंगे (वय १९, रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धिrendra ठाकूर (वय १९, रा. कामशेत, ता. मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (वय १९, रा. टाकवे, ता. मावळ) आणि निखील बाळू राऊत (वय २०, रा. कामशेत, ता. मावळ) या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर दिक्षीत दयानंद पुजारी (वय २०, रा. कामशेत) आणि कारचालक मयुर हनुमंत शिंदे (वय २०, रा. बऊर, ता. मावळ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

​घटनेची माहिती मिळताच फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे, शिरवळ पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सारोळा महामार्ग मदत केंद्राचे साहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत पडळकर, पोलीस कर्मचारी आणि शिरवळ रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. कारचा पार चुराडा झाल्याने मृतदेह आत अडकून पडले होते. पोलीस व स्थानिक नागरिकांनी तब्बल तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढले.

​जखमींवर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, मृतदेहांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. याप्रकरणी मालट्रकचालक शिवकुमार देवांगत (वय ३६, रा. कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक मयुर शिंदे याच्याविरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers