Home » पांचगणी » पांचगणी रोटरी क्लबचा विभागस्तरीय सोहळ्यात डंका ​सुनील कांबळे यांना ‘गव्हर्नर्स विशेष गौरव’; अमित बोधे ‘बेस्ट प्रेसिडेंट’, तर स्वप्नील परदेशी यांना ‘उत्कृष्ट डायरेक्टर’ पुरस्कार

पांचगणी रोटरी क्लबचा विभागस्तरीय सोहळ्यात डंका ​सुनील कांबळे यांना ‘गव्हर्नर्स विशेष गौरव’; अमित बोधे ‘बेस्ट प्रेसिडेंट’, तर स्वप्नील परदेशी यांना ‘उत्कृष्ट डायरेक्टर’ पुरस्कार

पांचगणी न्यूज नेटवर्क
​पांचगणी: रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या लातूर येथे पार पडलेल्या भव्य विभागस्तरीय पुरस्कार सोहळ्यात पांचगणी रोटरी क्लबने घवघवीत यश संपादन करत आपल्या समाजकार्याचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. सोलापूर, सातारा, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अहिल्यानगर या ११ जिल्ह्यांतील १०३ क्लब्सच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात पांचगणी रोटरी क्लबचा मुख्य आवाज असलेल्या ‘सिल्वर ओक’ या मासिक बुलेटिनने उल्लेखनीय स्थान पटकावत सुवर्णयशाची नोंद केली.

​याच दिमाखदार सोहळ्यात रोटरीच्या माध्यमातून तब्बल ४४ वर्षे अविरत समाजसेवा करणारे ‘सिल्वर ओक’चे संपादक व माजी अध्यक्ष रोटेरियन सुनील कांबळे यांना ‘डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स विशेष गौरव’ देऊन सन्मानित करण्यात आले. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी रोटरीत प्रवेश केलेल्या कांबळे यांनी अध्यक्ष, सहाय्यक प्रांतपाल आणि डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत रोटरी चळवळ अधिक बळकट केली आहे. त्यांच्या या प्रदीर्घ व निःस्वार्थ योगदानाबद्दल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन सुधीर लातुरे यांच्या हस्ते हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला; रोटेरियन अमित बोधे यांनी कांबळे यांच्या वतीने हा गौरव स्वीकारला.

​आपल्या कुशल नेतृत्वाची छाप पाडणारे पांचगणी रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष रोटेरियन अमित बोधे यांना कार्यकाळातील प्रभावी कामगिरी, सदस्यांचा वाढता सहभाग आणि विविध सेवा उपक्रमांना दिलेल्या गतीबद्दल ‘बेस्ट प्रेसिडेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. याचसोबत, रोटरी डिस्ट्रिक्टच्या यूथ कमिटीमध्ये भरीव योगदान देणारे माजी अध्यक्ष रोटेरियन स्वप्नील परदेशी यांना ‘बेस्ट डिस्ट्रिक्ट डायरेक्टर – यूथ सर्व्हिस’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

​या सोहळ्यास पांचगणी रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष रोटेरियन आदित्य गोळे, सचिव रोटेरियन ऋषी होळकर, माजी अध्यक्ष रोटेरियन भूषण बोधे आणि रोटेरियन सागर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सिल्वर ओक’ला मिळालेले यश आणि क्लबचा झालेला हा बहुमान संपूर्ण पांचगणी रोटरी परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असून, यामुळे आगामी काळात अधिक व्यापक स्वरूपात समाजकार्य करण्याचा उत्साह द्विगुणीत झाल्याची भावना सर्व सदस्यांनी व्यक्त केली.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers