पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पर्यटन आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी आणि भेडसावणाऱ्या स्थानिक समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचे संचालक व युवा नेते राजुशेठ राजपुरे यांनी मंत्रालयात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी महाबळेश्वर तालुक्यातील मंजूर विकासकामांची तातडीने अमलबजावणी करणे आणि नवीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी मिळण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या महत्त्वाच्या बैठकीस प्रवीणशेठ भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, अशी ठाम मागणी राजेंद्रशेठ राजपुरे यांनी या वेळी केली. याचबरोबर तालुक्यातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या नवीन विकासकामांना मंजुरी मिळावी, या संदर्भातील मागणीचे सविस्तर निवेदन मंत्री मकरंद आबा पाटील यांना सुपूर्द करण्यात आले.
सध्या महाबळेश्वर आणि परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती, पर्यटकांसह स्थानिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक व इतर दैनंदिन अडचणी यावरही या वेळी सखोल चर्चा झाली. या समस्यांची गांभीर्याने दखल घेत ना. मकरंद आबा पाटील यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला नागरिकांना त्वरित दिलासा देण्यासाठी आणि आवश्यक त्या सर्व आपत्कालीन उपाययोजना तात्काळ राबवण्याचे निर्देश दिले. या बैठकीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील रखडलेल्या कामांना प्रशासकीय गती मिळून नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.



