पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली मदत हीच खरी समाजसेवा आहे, असे प्रतिपादन पाचगणीच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी केले. पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक १ व २ मधील तब्बल ३६० विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रलच्या वतीने मोफत गणबूट वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः पावसाळ्यात गणबूटांची आवश्यकता अधिक भासते. विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रलने पुढाकार घेत ३६० विद्यार्थ्यांना गणबूटांचे वाटप केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पालकांनीही समाधान व्यक्त केले.
सौ. कऱ्हाडकर म्हणाल्या, “समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रलने विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून केलेले हे कार्य केवळ मदतीपुरते मर्यादित नसून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.”
यावेळी रोटरी क्लबच्या चंद्रेश अंबानी, राजन दुआ आणी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणबूटांचे वितरण करण्यात आले. नवीन गणबूट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. शिक्षक व पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत रोटरी क्लबचे आभार मानले.
कार्यक्रमास पाचगणी नगरपरिषदचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे, माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका लक्ष्मी कऱ्हाडकर, नगरसेवीका अभिलाषा कऱ्हाडकर,नगरसेवक प्रसाद कारंजकर, विनोद बिरामणे, शिक्षण सभापती विमल भिलारे, मुख्याध्यापक लक्ष्मण हिरवे, शिक्षक रोहन पवार, रमजान सय्यद, श्रीकृष्ण कापसे, महेश वाघमारे, स्वाती ढमाळ, वैशाली घोणे, वंदना शिंदे, साहेबराव गोळे, पल्लवी गंभीर, राजा सपकाळ, अनिता खरात, सुषमा दिघे, अंकिता धामणसे, प्रतीक धामणसे, सारिका गायकवाड यांच्यासह पालक व मान्यवर उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल ही संस्था दरवर्षी नगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्याना विविध शैक्षणिक साहित्य वाटते. संस्थेने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला असून, या उपक्रमामुळे ३६० विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



