पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी: भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी पर्वानंतरच्या उत्साही वातावरणात, पांचगणी गिरीस्थान नगरपालिकेच्या ‘श्री घाटजाई शहर विकास आघाडी’च्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकी जपणारा उपक्रम राबवण्यात आला. शहरातील अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांना विविध प्रकारचे कलर्स सेट, आकर्षक टिफिन बॉक्स आणि कॅडबरीचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. या उपक्रमामुळे लहानग्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि हास्य पाहायला मिळाले.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपनगराध्यक्ष माधुरी कासुर्डे यांनी सांगितले की, “देशाचे उज्ज्वल भविष्य हे आपल्या अंगणवाड्यातील या लहानग्या चिमुकल्यांच्या रूपात घडत असते. त्यांच्यावर बालवयातच उत्तम संस्कार व्हावेत, त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी ‘श्री घाटजाई शहर विकास आघाडी’ नेहमीच कटिबद्ध आहे. स्वातंत्र्य दिनाचा आनंद या निष्पाप बालकांसोबत साजरा करताना मनाला एक वेगळेच समाधान मिळते.”
आरोग्य सभापती राजश्री सणस यांनी आपल्या मनोगतात बालकांच्या आरोग्य व पोषणावर भर दिला. त्या म्हणाल्या, “अंगणवाडी हे मुलांच्या सर्वांगीण विकासाचे पहिले पाऊल आहे. बालकांचे आरोग्य सुदृढ राहिले तरच देश बलशाली होईल. या चिमुकल्यांना सकस आहारासोबतच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे असे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे. अंगणवाडी सेविकांचे या बालकांना घडवण्यात मोठे योगदान असून, नगरपालिकेच्या वतीने त्यांना नेहमीच सहकार्य केले जाईल.”
या स्नेहसोहळ्याला आरोग्य सभापती राजश्री सणस, शिक्षण सभापती विमल भिलारे, नगरसेविका स्वाती कांबळे, सुप्रिया माने, अमृता गोळे, परवीन मेमन आणि शिल्पा माने यांच्यासह शहरातील विविध अंगणवाड्यांच्या सेविका, मदतनीस व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी थेट बालकांशी संवाद साधत त्यांना प्रेमाने खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अंगणवाडी सेविकांनी श्री घाटजाई शहर विकास आघाडीच्या या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार मानले.



