Home » सातारा » शेखर गोरेंची अखेर ‘धनुष्यबाणा’ला साथ; १ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वाजत-गाजत शिवसेनेत प्रवेश!

शेखर गोरेंची अखेर ‘धनुष्यबाणा’ला साथ; १ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वाजत-गाजत शिवसेनेत प्रवेश!

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप

सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि माण-खटाव भागातील प्रभावशाली नेते शेखरभाऊ गोरे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या १ सप्टेंबर रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेखर गोरे अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे माण आणि खटाव तालुक्यामध्ये शिवसेनेला मोठे बळ मिळणार असून, सातारा जिल्ह्यातील राजकीय गणिते पुरती बदलून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या काळात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता न केल्याने शेखर गोरे कमालीचे नाराज होते. महायुतीमधील या अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपपासून अंतर ठेवणे पसंत केले होते. अखेर आपल्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून आणि पुढील राजकीय भवितव्याचा विचार करून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

शेखर गोरे यांची माण आणि खटाव तालुक्यात जनमानसावर आणि सहकार क्षेत्रावर मजबूत पकड आहे. जिल्हा बँक, स्थानिक सहकारी संस्था आणि युवकांचे मोठे संघटन ही त्यांची खरी ताकद मानली जाते. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ भाजपलाच नव्हे, तर विरोधकांनाही मोठा धक्का बसला आहे. या प्रवेशामुळे माण-खटाव विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची ताकद कैक पटीने वाढणार असून आगामी निवडणुकांमध्ये या निर्णयाचे पडसाद उमटणार आहेत. १ सप्टेंबरच्या या प्रवेश सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचे समजते.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers