पांचगणी न्यूज नेटवर्क
भुईंज : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सुरूर उड्डाणपुलाखाली मध्यरात्रीच्या सुमारास देशी बनावटीचे पिस्तुल कमरेला खोचून संशयितरीत्या थांबलेल्या एका तरुणाला भुईंज पोलिसांनी अत्यंत शिताफीने जाळ्यात पकडले. भुईंज पोलिसांच्या गस्ती पथकाने मध्यरात्रीच्या अंधारात ही धाडसी कारवाई करत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रसाद शुक्राचार्य बागल (वय २५, रा. सुरूर, ता. वाई) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ४५ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कवठे (ता. वाई) परिसरात शासकीय वाहनातून रात्रौ गस्त (पेट्रोलिंग) घालत होते. याच दरम्यान सपोनि पृथ्वीराज ताटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, सुरूर येथील उड्डाणपुलाखाली एक तरुण संशयितरीत्या उभा असून त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल लावलेले आहे. बातमीदाराने दिलेल्या वर्णनानुसार सदर तरुणाने काळ्या रंगाची हाफ बरमुडा व ग्रे रंगाचा फुल बाह्यांचा टी-शर्ट परिधान केलेला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कारवाईची चक्रे हलवली. पोलीस हवालदार आप्पा कोलवडकर यांनी लागलीच दोन पंचांना पाचारण केले. त्यानंतर सपोनि ताटे, पोलीस पथक व पंचांनी सुरूर उड्डाणपुलाखाली छापा टाकला. बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचा तरुण त्या ठिकाणी संशयित हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी कोणताही संशय न येऊ देता त्याला जागीच घेराव घालून ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष करण्यात आलेल्या अंगझडतीत आरोपीच्या कमरेला ४५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल दडवलेले सापडले. पोलिसांनी तत्काळ सदर पिस्तूल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २८९/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईनंतर आरोपीला वाई येथील माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने हे बेकायदेशीर पिस्तुल कशासाठी आणि कोणाकडून आणले होते? त्याचा महामार्गावर किंवा परिसरात कुठल्या गंभीर गुन्ह्याचा कट होता का? या सर्व दृष्टीने भुईंज पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याच्या परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलीस शिपाई सोमनाथ बल्लाळ आणि सागर मोहिते यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे करत आहेत.



