Home » सातारा » साताऱ्याचा शूरसुपुत्र नाईक रोहित पवार अनंतात लीन; शासकीय इतमामात चिंचणीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

साताऱ्याचा शूरसुपुत्र नाईक रोहित पवार अनंतात लीन; शासकीय इतमामात चिंचणीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

पांचगणी न्यूज नेटवर्क /मोहन जगताप

सातारा, दि. ११ : देशसेवेचे व्रत जपणाऱ्या आणि घराण्यातील सैनिकी परंपरेचा वारसा अभिमानाने चालवणाऱ्या साताऱ्याचा शूरसुपुत्र, जवान नाईक रोहित रामचंद्र पवार (वय ३६) यांच्यावर आज चिंचणी (ता. सातारा) येथे अश्रूधार आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या दोन महिन्यांवर निवृत्ती आलेली असतानाच उत्तर प्रदेशातील झाशी येथे ‘ऑन ड्युटी’ असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांना वीरमरण आले. त्यांच्या या अचानक जाण्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

​नाईक रोहित पवार हे सन २००९ मध्ये भारतीय लष्करात भरती झाले होते. सध्या ते झाशी येथे ११४ आर्मर्ड इंजिनिअर रेजिमेंटमध्ये नाईक पदावर सेवा बजावत होते. कर्तव्य बजावत असतानाच १० तारखेला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. पवार कुटुंब हे देशसेवेसाठी वाहून घेतलेले कुटुंब म्हणून ओळखले जाते. त्यांचे वडील आणि दोन्ही भाऊ लष्करातून सेवानिवृत्त झाले असून मोठे बंधू सध्या महाराष्ट्र पोलिसांत कार्यरत आहेत. अशा या देशभक्त कुटुंबातील रोहित अवघ्या दोन महिन्यांत निवृत्त होऊन घरी परतणार होते; मात्र त्याआधीच त्यांचा तिरंग्यात वेढलेला पार्थिव देह गावात आल्याने उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले.

​आज दुपारी बाराच्या सुमारास रोहित पवार यांचे पार्थिव साताऱ्यातील मोळाचा ओढा येथे पोहोचले. तेथून चिंचणी गावापर्यंतच्या सुमारे १२ किलोमीटरच्या मार्गावर हजारो तरुणांनी दुचाकी रॅली काढून वीरजवानाला अंतिम सलामी दिली. मार्गावरील प्रत्येक गावात ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पार्थिवाचे दर्शन घेतले आणि ‘नाईक रोहित पवार अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दुपारी दोनच्या सुमारास पार्थिव मूळ गावी चिंचणी येथे आणण्यात आले.

​पार्थिव राहत्या घरी नेल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा वेण्णा कण्हेर जलाशयातील स्मशानभूमीच्या दिशेने निघाली. प्रशासनाच्या वतीने सैनिकांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आणि शंखध्वनीच्या नादात वीरजवानाला अंतिम सलामी (लास्ट पोस्ट) दिली. रोहित यांच्या दोन लहान मुली आणि पुतण्याने साश्रू नयनांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, भावजय, पत्नी, दोन लहान मुली आणि पुतणे असा मोठा परिवार आहे.

​या वेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हा सैनिक कल्याण मंडळ, उपविभागीय अधिकारी आशिष बारकूल, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सभापती महेश गाडे, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव सावंत, अजित साळुंखे, पंचायत समिती सदस्य प्रभाकर सावंत, नामदेव सावंत, जितेंद्र सावंत, तहसीलदार समीर यादव आणि निवासी नायब तहसीलदार प्रशांत कदम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. साताऱ्याच्या या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी संपूर्ण परिसरातील जनसागर लोटला होता.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers