पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी, ता. 13 : ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाचा संदेश देणारे थोर संत श्री संत सेना महाराज यांची जयंती (पुण्यतिथी) पांचगणी व परिसरात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. पांचगणी परिसरातील समस्त नाभिक समाजाच्या वतीने या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत पांचगणी शहरासह गोडवली, दांडेघर, खिंगर, भोसे, भिलार आणि काटवली या परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. येथील प्रसिद्ध घाटजाई मंदिर प्रांगणात हा सोहळा अत्यंत भावूक व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सकाळी श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिवसभरात भजन, हरिजागर आणि कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता. समाजोपयोगी विचार आणि संतांची शिकवण जपण्याचा संकल्प या वेळी उपस्थितांनी केला. या सोहळ्याला पांचगणी व परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून संत सेना महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
या प्रसंगी नाभिक समाजाचे अध्यक्ष नितीन पवार, गोकुळ पवार, रवींद्र पवार, प्रवीण सपकाळ, महेश पवार, संतोष सपकाळ, गणेश पवार, प्रशांत पवार, कुमार पवार, धीरज पवार, प्रवीण पवार, प्रदीप पवार, राजू पवार, बजरंग पवार, महादेव सपकाळ, विलास पवार, लक्ष्मण सपकाळ, विशाल पवार, विश्वास पवार, संतोष मोहिते, समीर पवार, अनिल पवार यांच्यासह परिसरातील सर्व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी प्रवीण पवार यांनी सर्व उपस्थितांचे व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.



