पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांचे वैधानिक, वित्तीय, कार्यकारी आणि प्रशासकीय अधिकार एका आदेशान्वये अचानक गोठविल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावर विपरीत परिणाम झाला आहे. जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांचे हे अधिकार प्रशासनाने तातडीने पूर्ववत करावेत तरच शहर विकास सुरळीत चालेल अशी मागणी पांचगणी नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांनी केली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ आणि महाराष्ट्र नगरपरिषद लेखा संहिता २०२३ द्वारे नगराध्यक्षांना वैधानिक अधिकार प्राप्त झालेले आहेत. मात्र, २०१९ आणि २०२४ मधील अधिनियम दुरुस्तीच्या नावाखाली नगराध्यक्षांचे स्वाक्षरीचे, वित्तीय व प्रशासकीय अधिकार मोठ्या प्रमाणावर काढून घेण्यात आले आहेत. २०१५ सालापासून नगराध्यक्ष हे जनतेतून थेट निवडून येत आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी आणि शहराच्या गतिमान विकासासाठी नगराध्यक्षांना पूर्वीपेक्षा अधिक अधिकार मिळणे गरजेचे आहे, असे मत नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नगराध्यक्ष हक्क समितीच्या माध्यमातून राज्य शासनाकडे मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये, नगराध्यक्षांना २०१५ प्रमाणे सर्व वित्तीय व प्रशासकीय अधिकार पूर्ववत बहाल करावेत. नगरपालिका हद्दीतील सर्व विकासकामे ही स्थानिक नगरपालिका यंत्रणेमार्फतच राबवली जावीत, ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवू नयेत. तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षांना ५० टक्क्यांपर्यंत थेट निधी खर्च करण्याचा अधिकार असावा, असा आग्रह धरण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन समितीने नगराध्यक्षांनी पाठवलेले विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करून तो निधी थेट नगरपालिकेस वर्ग करावा; त्यात कपात करून तो अन्य यंत्रणा किंवा लोकप्रतिनिधींकडे वळवू नये. याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नगराध्यक्षांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश केला जावा, अशी आग्रही भूमिका दिलीप बगाडे यांनी मांडली आहे.
लोकशाही पद्धतीने जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या अधिकारांवर गदा आल्याने शहरातील विकासकामे रखडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून अधिकार पूर्ववत द्यावेत, अन्यथा महाराष्ट्र नगराध्यक्ष हक्क समितीच्या वतीने तीव्र संघर्ष उभारला जाईल, असा इशाराही दिलीप बगाडे यांनी पाचगणी येथून दिला.



