पांचगणी न्यूज नेटवर्क
भिलार : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून बालकांचे पोषण, आरोग्य आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अहोरात्र राबणाऱ्या अंगणवाडी सेविका हा ग्रामीण व्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यांच्या याच सेवाभावी वृत्तीचा गौरव करण्यासाठी ‘सेवा पर्व’ अभियानानिमित्त भिलार येथे महाबळेश्वर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमास महाबळेश्वर तालुक्यातील भिलार, गोडोली, भोसे, मेटगुताड, दांडेकर, ताईघाट, उंबरी, अवकाळी, राजपुरी, खिंगर, नंदनवन कॉलनी, उमरी, धावली, कासवंड, गुरेघर अशा १६ गावांतील अंगणवाडी सेविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘सेवा पर्व’ अभियानांतर्गत सातारा जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तेजस्विनीताई घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा जिल्हा सरचिटणीस वैशालीताई भिलारे यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला.
ग्रामीण भागात कुपोषणमुक्ती, लसीकरण, बालकांचे पूर्वप्राथमिक शिक्षण आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना घराघरांत पोहोचवण्याचे अत्यंत जबाबदारीचे काम अंगणवाडी सेविका करत असतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्व उपस्थित अंगणवाडी सेविकांना पर्यावरणपूरक संदेश देणारी रोपे (झाडे) देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास भिलारचे प्रशासक तथा माजी सरपंच शिवाजी भिलारे, ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण यांच्यासह भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवाभावाने पोहोचणाऱ्या या महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने अंगणवाडी सेविकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. ग्रामीण भागातील महिलांच्या निस्वार्थ कार्याची दखल समाजाने घेणे गरजेचे असून, ‘सेवा पर्वा’च्या माध्यमातून असा सन्मान करण्याचा उपक्रम पुढेही निरंतर सुरू ठेवण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.



