Home » वाई » वाई परिसरात पिस्टल बाळगून दहशत माजवणारे दोघे गजाआड; १ लाख ४० हजारांचे दोन गावठी कट्टे अन् ५ काडतुसे जप्त

वाई परिसरात पिस्टल बाळगून दहशत माजवणारे दोघे गजाआड; १ लाख ४० हजारांचे दोन गावठी कट्टे अन् ५ काडतुसे जप्त

पांचगणी न्यूज नेटवर्क 

वाई : वाई ते सुरूर रस्त्यावरील शेंदुरजणे कॅनॉल परिसरात पिस्टल हातात बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोघांच्या वाई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ४० हजार २५० रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे गावठी पिस्टल (कट्टे) आणि ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. न्यायालयाने या दोन्ही संशयितांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

​सुदेश दीपक पाटणे आणि अक्षय विलास देसाई अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शेंदुरजणे गावच्या हद्दीत एक युवक पिस्टल हातात घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना खबऱ्यामार्फत गुरुवारी दुपारी मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून छापा मारण्याचे आदेश दिले.

​पोलीस पथकाने गुरुवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासूनच शेंदुरजणे कॅनॉल परिसरात सापळा रचला होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुदेश पाटणे हा संशयितरीत्या फिरताना दिसताच पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल आढळून आले. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, हे पिस्टल त्याने स्वप्निल उर्फ सोन्या प्रदीप जगताप याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. तसेच अक्षय देसाई यानेही सोन्या जगताप याच्याकडूनच दुसरे पिस्टल घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.

​या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ अक्षय देसाई याचा वाई परिसरात शोध सुरू केला. रात्री उशिरा तो परखंदी रोड चौकात आढळून आला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यास धाडसाने पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे आणखी एक गावठी पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

​वाई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली असून, शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे पिस्टल मुख्य पुरवठादार सोन्या जगताप याच्याकडून आरोपींनी कशासाठी आणले होते आणि वाई परिसरात कोणता मोठा गुन्हेगारी बेत होता का, याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे करत आहेत.

​ही धाडसी कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख अमित सुर्वे, पोलीस अंमलदार हेमंत शिंदे, सोमनाथ टिके, विक्रम धोत्रे, विशाल शिंदे, नितीन कदम, हणमंत गाडे आणि महिला पोलीस नाईक प्रियंका कदम यांच्या पथकाने केली.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers