Home » वाई » जनता अर्बन बँकेत ऐतिहासिक परिवर्तन; परिवर्तन पॅनेलचा ‘क्लिन स्विप’, सुरेश कोरडे यांची ३० वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात

जनता अर्बन बँकेत ऐतिहासिक परिवर्तन; परिवर्तन पॅनेलचा ‘क्लिन स्विप’, सुरेश कोरडे यांची ३० वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात

पांचगणी न्यूज नेटवर्क 

वाई : सहकार क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या येथील ‘जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके’च्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी (ता. २१) अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सत्ता परिवर्तन झाले. खासदार नितीन पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखालील ‘परिवर्तन पॅनेल’ने सर्व जागांवर एकतर्फी विजय मिळवत सत्ताधारी संस्थापक पॅनेलला भुईसपाट केले. गेल्या ३० वर्षांपासून बँकेवर एकहाती वर्चस्व गाजवणारे संस्थापक पॅनेलचे प्रमुख सुरेश कोरडे यांच्यासह संपूर्ण पॅनेलला या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी तब्बल १५०० ते १६०० मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत जनता अर्बन बँकेत नव्या युगाची सुरुवात केली आहे.

​सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या जनता अर्बन बँकेच्या २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही पंचवार्षिक निवडणूक पार पडली. संचालक मंडळाच्या एकूण ११ जागांपैकी भटक्या-विमुक्त जाती-जमाती (VJNT) राखीव मतदारसंघातून परिवर्तन पॅनेलचे तात्याबा बबन धायगुडे (वाघोशी, ता. खंडाळा) यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे उर्वरित १० जागांसाठी रविवारी (ता. २०) २५ मतदारसंघांत उत्साहात ५४ टक्के मतदान झाले होते. ५,२७८ सभासदांनी आपल्या मताचा हक्क बजावला होता.

​सोमवारी प्रशासकीय इमारतीतील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अनिल क्षीरसागर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय वेधले, स्वप्नील माळी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कडक बंदोबस्तात मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी घेतलेली भक्कम आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. निकाल स्पष्ट होताच प्रशासकीय इमारतीच्या परिसरात आणि वाई शहरात परिवर्तन पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजर करत जोरदार जल्लोष केला.

​निकाल एका दृष्टीक्षेपात :

​सर्वसाधारण मतदारसंघ (६ जागा) :

विजयी उमेदवार:

​शेखर फरांदे, ओझर्डे (३,५५७ मत)

​निळकंठ मोरे, पाचवड (३,५५७ मत)

​राहुल डेरे, कवठे (३,१८३ मत)

​तानावजी जाधव, विठ्ठलनगर खेड (३,१७६ मत)

​सुभाष नवले, सातारा (३,१५० मत)

​महेंद्र जमदाडे, फुलेनगर (२,७२५ मत)

​पराभूत उमेदवार: सुरेश कोरडे (१,७५१), जगन्नाथ कदम (१,६४०), संजय चव्हाण (१,६२२), सुनील जगताप (१,६११), सुनील जमदाडे (१,६०६) व सुनील गाढवे (६७).

​महिला राखीव मतदारसंघ (२ जागा) :

विजयी उमेदवार: वैशाली निलेश चव्हाण, सुरूर (३,४०७ मत) आणि रेखा संतोष पिसाळ, व्याजवाडी (३,१८४ मत).

पराभूत: विजया सूर्यकांत जायकर (१,८४८ मत).

​अनुसूचित जाती-जमाती राखीव (१ जागा) :

विजयी उमेदवार: अजय गायकवाड, कडेगाव (३,३४७ मत).

पराभूत: प्रवीण ननावरे (१,८४८ मत).

​इतर मागास प्रवर्ग (OBC) राखीव (१ जागा) :

विजयी उमेदवार: बाळकृष्ण सपकाळ, यशवंतनगर (३,३२८ मत).

पराभूत: अतुल वाईकर (१,८५६ मत).

​श्रमिक पतसंस्था ते जनता बँक : ३० वर्षांच्या सत्तेचा ‘द एंड’

​या निवडणुकीतील पराभवामुळे जनता अर्बन बँकेच्या इतिहासातील एका मोठ्या अध्यायाचा शेवट झाला आहे. १३ जून १९८३ रोजी शामराव कर्णे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थे’ची स्थापना केली होती. १९९० पर्यंत कर्णे हे संस्थापक चेअरमन होते. त्यानंतर चेअरमनपदाची धुरा सुरेश कोरडे यांच्याकडे आली. १९९५ मध्ये पुन्हा कर्णे चेअरमन झाले, मात्र १९९६ मध्ये त्यांनी राजीनामा दिल्यानंतर कोरडे यांनी बँकेची सूत्रे हाती घेतली.

​१९९८ मध्ये या पतसंस्थेचे रूपांतर ‘जनता सहकारी बँके’मध्ये झाले. तेव्हापासून आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सुरेश कोरडे यांनी विरोधकांना धूळ चारत आपली सत्ता अबाधित ठेवली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत वाढता असंतोष, बदलती राजकीय गणिते आणि खासदार नितीन पाटील यांच्या परिवर्तन पॅनेलची आक्रमक रणनीती यांसमोर कोरडे यांचा ३० वर्षांचा गड अखेर ढासळला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers