Home » पांचगणी » खिंगर केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा पांगारी येथे उत्साहात संपन्न; पर्यावरणपूरक स्वागताने जिंकली उपस्थितांची मने

खिंगर केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा पांगारी येथे उत्साहात संपन्न; पर्यावरणपूरक स्वागताने जिंकली उपस्थितांची मने

 

​पाचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित न राहता ती निसर्गाशी जोडली गेली पाहिजे, या उदात्त विचारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांगारी येथे गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) आयोजित करण्यात आलेली ‘केंद्र खिंगर शिक्षण परिषद’ अत्यंत खेळीमेळीच्या, आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शैक्षणिक मंथनासोबतच पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देणाऱ्या या परिषदेने उपस्थितांची विशेष मने जिंकली.

​कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने झाला. या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी राजपुरी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. चोरट सर होते. कार्यक्रमास केंद्र प्रमुख श्री. प्रदीप दाभाडे, खिंगर शाळेचे मुख्याध्यापक संतोष परबती पारठे सर, नगरपालिका शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक लक्ष्मण हिरवे सर, तायघाट शाळेचे मुख्याध्यापक डॉ. विजय सावंत सर, संगीता मोरे मॅडम, सुजाता ढेबे मॅडम, अरविंद रघुनाथ सुरत सर, अमित कारंडे सर, आनंदा पारठे सर यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. तसेच माजी सरपंच व शिक्षणप्रेमी श्री. जानू पांगारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र पांगारे, सदस्या प्रिया योगेश पांगारे आणि विशेष सहकार्य लाभलेले श्री. रवींद्र पांगारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

​पारंपरिक व पर्यावरणपूरक स्वागत

कार्यक्रमात पांगारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कमल आंब्राळे मॅडम आणि उपशिक्षिका वनिता कदम मॅडम यांच्या संकल्पनेतून सर्व शिक्षक व पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. नेहमीप्रमाणे पुष्पगुच्छ किंवा प्लास्टिकच्या भेटवस्तू न देता, प्रत्येक शिक्षकाला एक जिवंत रोपे आणि सन्मानाची गांधी टोपी देऊन अनोख्या व पर्यावरणपूरक पद्धतीने सन्मानित करण्यात आले.

​या प्रसंगी शाळेचा विद्यार्थी पार्थ पांगारे याने आजच्या डिजिटल युगात आपली संस्कृती जपत शिक्षणातून विद्यार्थ्यांनी प्रगती कशी साधावी, यावर अत्यंत अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. तत्पश्चात नवीन शैक्षणिक धोरण, आधुनिक अध्यापन पद्धती व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

​‘एक शिक्षक – एक रोपटे’ उपक्रम अनुकरणीय: अमोल गायकवाड

शिक्षकांच्या या अनोख्या स्वागतावर प्रतिक्रिया देताना श्री. अमोल गायकवाड सर म्हणाले, “केलेले आगत-स्वागत निश्चितच कौतुकास्पद होते. ‘एक शिक्षक – एक रोपटे’ ही संकल्पना केवळ औपचारिक स्वागत न राहता पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देऊन गेली. फुलांचा गुच्छ काही दिवसांत कोमेजतो, पण हे रोपटे वर्षानुवर्षे वाढत राहील, सावली आणि ऑक्सिजन देईल. शिक्षकांच्या हातात दिलेले हे रोपटे ज्ञान, संस्कार आणि निसर्गप्रेमाचे प्रतीक आहे. पांगारी शाळेचा हा दूरदृष्टीचा उपक्रम संपूर्ण तालुक्यासाठी अनुकरणीय आहे.”

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उत्कृष्ट सूत्रसंचालन पांगारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कमल आंब्राळे मॅडम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. माने मॅडम यांनी मानले. शिक्षण आणि पर्यावरणाचा हा सुंदर संगम घडवून आणल्याबद्दल केंद्र खिंगरमधील सर्व शिक्षकांनी पांगारी शाळेच्या व्यवस्थापनाचे व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers