Home » मुंबई » फलटणचे उपअभियंता अजय देशपांडे यांना राज्य शासनाचा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार; बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुंबईत गौरव

फलटणचे उपअभियंता अजय देशपांडे यांना राज्य शासनाचा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार; बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुंबईत गौरव

पांचगणी न्यूज नेटवर्क 

​मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात प्रदीर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावत तांत्रिक कौशल्य, काटेकोर नियोजन, कामातील गुणवत्ता आणि वेळेचे भान यांचा प्रभावी समन्वय साधणारे फलटण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांना राज्य शासनाच्या वतीने यंदाच्या ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईत पार पडलेल्या एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते देशपांडे यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन, निष्कलंक आणि अत्यंत उल्लेखनीय शासकीय सेवेची दखल घेत राज्य शासनाने हा मानाचा गौरव केला आहे.

​अजय देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात तब्बल ३१ वर्षे ६ महिने इतकी प्रदीर्घ सेवा बजावली आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विविध संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण ठिकाणांवर जबाबदारी सांभाळताना रस्ते, पूल तसेच विविध शासकीय इमारतींच्या बांधकामांमध्ये तांत्रिक गुणवत्ता आणि सूक्ष्म नियोजनाला नेहमीच प्राधान्य दिले. शासकीय कामकाजात नियमांचे पालन, कामाचा सर्वोच्च दर्जा आणि वेळेची शिस्त यांना महत्त्व देत त्यांनी आपल्या कार्यशैलीतून प्रशासनात एक वेगळा आणि स्वतंत्र ठसा उमटवला आहे.

​विशेषत: महाबळेश्वर बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांनी तांत्रिक कौशल्याची मोठी चुणूक दाखवली. महाराष्ट्रातील अत्यंत प्रेक्षणीय आणि अवघड मानल्या जाणाऱ्या, तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शिवसागर (कोयना) जलाशयावरील तापोळा येथील भव्य ‘केबल स्टे ब्रीज’चे (Cable-Stayed Bridge) काम देशपांडे यांनी अतिशय उत्तमरीत्या हाताळले. भौगोलिक आव्हानांवर मात करत हा पूल पूर्णत्वाकडे नेण्यात त्यांचे मोलाचे तांत्रिक योगदान राहिले आहे.

​यानंतर फलटण बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांनी तालुक्यातील रस्ते व विविध विकासकामांचे नियोजन, प्रत्यक्ष स्थळ पाहणी, तांत्रिक मार्गदर्शन आणि गुणवत्तेची तपासणी ही आव्हानात्मक जबाबदारी लिलया पार पाडली. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांचा दर्जा टिकवून ठेवण्याबरोबरच कामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी त्यांनी यंत्रणांशी उत्तम समन्वय साधत सतत पाठपुरावा केला. देशपांडे यांच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता, तांत्रिक अचूकता आणि कामाच्या गुणवत्तेची काटेकोर अंमलबजावणी यांना नेहमीच प्राधान्य राहिले आहे.

​आपल्या ३१ वर्षांहून अधिक कालावधीच्या प्रवासात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे देशपांडे आवर्जून सांगतात. अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे व श्रीपाद जाधव यांच्या मार्गदर्शनामुळेच अवघड आव्हानांना सामोरे जात गुणवत्तापूर्ण कामे करता आली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उतरून सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अजय देशपांडे यांच्या प्रदीर्घ सेवेला ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने मिळालेली ही पावती सार्वजनिक बांधकाम विभागासाठी तसेच संपूर्ण फलटण व सातारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers