पांचगणी न्यूज नेटवर्क
वाई : खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी असलेला प्रशांत राजपुरे याला वाई येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलासा देत जामीनावर मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. वैद्यकीय व वैज्ञानिक पुराव्यांचा अभाव आणि पोलीस तपासातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधत, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाई पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या (कलम ३०७ अन्वये) गुन्ह्याप्रकरणी प्रशांत राजपुरे याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी जामीन मिळण्यासाठी आरोपीच्या वकिलांकडून वाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. अर्जदाराच्या वतीने निष्णात वकिलांच्या पथकाने न्यायालयात बाजू मांडली.
युक्तिवादादरम्यान आरोपीचे वकील ॲड. प्रधु्न्य गाढवे, ॲड. स्नेहांकित सूर्यवंशी आणि ॲड. एस. मालुसरे यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवले. “आरोपीने संबंधित गुन्हा केला असल्याचे अद्याप कोणत्याही वैज्ञानिक किंवा न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) पुराव्यांद्वारे सिद्ध झालेले नाही. पोलीस तपासादरम्यान केलेल्या कार्यवाहीत अनेक कायदेशीर व प्रक्रियात्मक त्रुटी राहिल्या आहेत. गुन्ह्यातील जप्ती, नमुने गोळा करणे आणि पंचनाम्याची प्रक्रिया यावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे ठोस पुराव्यांशिवाय केवळ आरोपांच्या आधारावर आरोपीला प्रदीर्घ काळ कोठडीत ठेवणे अन्यायकारक ठरेल,” असा सबळ युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला.
बचाव पक्षाचा हा युक्तिवाद आणि सादर केलेले मुद्दे ग्राह्य धरत न्यायालयाने संशयित आरोपी प्रशांत राजपुरे याला जामीन मंजूर केला. या खटल्यात आरोपीच्या वतीने ॲड. प्रधु्न्य गाढवे, ॲड. स्नेहांकित सूर्यवंशी आणि ॲड. एस. मालुसरे यांनी यशस्वी कामकाज पाहिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तपास यंत्रणांच्या तपासातील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत.



