पांचगणी न्यूज नेटवर्क
वाई : नवी मुंबई, खारघर येथील व्हिबॉर्ग हायस्कूलमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत वाई येथील ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात ज्ञानदीपच्या संघाने मुंबई शहराच्या संघावर १३-९ अशा गोलफरकाने मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेत ज्ञानदीपच्या संघाने पहिल्या सामन्यापासूनच प्रभावी खेळ केला. पहिल्या सामन्यात रायगड जिल्ह्याविरुद्ध ७-६ अशी चुरशीची बाजी मारल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगर संघाचा २०-४ असा मोठा पराभव केला. उपांत्य सामन्यात पुणे संघाविरुद्ध ९-७ अशी मात करत संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात मुंबई शहराविरुद्ध सुरुवातीपासूनच भक्कम बचाव आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत १३-९ असा विजय मिळवला.
विजेत्या संघात आर्या समीर जाधव, जान्हवी सूर्यवंशी, शमिका ढोले-पाटील, श्रद्धा वाघमारे, शरयू जाधव, ऋत्वा खांडे, आराध्या पिसाळ, स्पृहा पवार, ईशा निकम आणि अंकिता कदम या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला क्रीडा मार्गदर्शक सचिन लेंभे यांचे मार्गदर्शन लाभले.
या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जगताप, उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ, सचिव बाळकृष्ण पवार, प्राचार्या शुभांगी पवार, खजिनदार चंद्रकांत शिंदे, सर्व विश्वस्त, सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार नितीन (काका) पाटील, शिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींनी विजेत्या खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.



