पांचगणी न्यूज नेटवर्क
मेढा : जावली तालुक्यातील कुडाळी मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात यंदा पर्जन्यमानाची मोठी तूट राहिल्याने पेरणी झालेली पिके डोळ्यांसमोर वाळून जात असून, तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्यापूर्वी आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी कुडाळी धरणातील उपलब्ध पाणी डाव्या कालव्यातून तात्काळ सोडावे, अशी आक्रमक मागणी जावलीचे भूमिपुत्र, माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
तालुक्यातील सरताळे, कापसेवाडी यांसह विविध गावांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन शशिकांत शिंदे यांनी दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. पावसाने मारलेल्या ओढीमुळे सोयाबीन, भुईमूग या नगदी पिकांसह पारंपरिक पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधून त्यांना तातडीने निवेदन दिले.
कुडाळी प्रकल्पाच्या कालव्याची पाईपलाईनद्वारे बहुतांश कामे पूर्ण झालेली आहेत. धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना केवळ तांत्रिक जोडणीच्या कारणास्तव हे पाणी अडकून पडणे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून कालव्याची आवश्यक ती तात्पुरती जोडणी (बायपास किंवा तात्पुरते कनेक्शन) करावी आणि डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करावा, असा आग्रही सूर निवेदनातून आवळण्यात आला आहे.
कुडाळी खोऱ्यात आणि जावलीच्या पूर्व भागात यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. विहिरी, बोअरवेलची भूजल पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. या संकटाच्या काळात धरणात साठवलेले पाणी जर हक्काच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले नाही, तर मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
पाटबंधारे विभागाने टंचाईची परिस्थिती अधिक बिकट होण्याची वाट न पाहता, लालफितीच्या कारभारात न अडकता तातडीने तांत्रिक अडसर दूर करून पाणी नियोजन करावे आणि जावलीतील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी शशिकांत शिंदे यांनी केली आहे.



