पांचगणी न्यूज नेटवर्क
मुंबई : शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘शरद रत्न पुरस्कार’, तर कलाक्षेत्र, सांस्कृतिक पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना ‘कला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेले पत्रकार, संपादक भीमराव धुळप यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक कार्य आणि रुग्णसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कला गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
भीमराव धुळप यांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत यापूर्वी विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविले असून, आजपर्यंत त्यांना २७ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात आता ‘कला गौरव पुरस्काराची’ मानाची भर पडली आहे.
या पुरस्कार सोहळ्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार, दैनिक पुण्यप्रतापचे संपादक विवेकानंद पाटील, संतोष लिंबोरे, एच. बी. जंगम, डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
भीमराव धुळप यांना ‘कला गौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



