पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून महाबळेश्वर-पाचगणी परिसरासह सातारा जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘इनर व्हील क्लब ऑफ पाचगणी’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. क्लबच्या अध्यक्षा सौ. अंजना राजेंद्र पारठे यांच्या गतिमान नेतृत्वाची जिल्हास्तरावर दखल घेतली गेली असून, त्यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘प्रेसिडेंट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे इनर व्हील जिल्हा ३१३ च्या वतीने आयोजित ‘अवंतिका’ जिल्हा असेंब्ली कार्यक्रमात हा गौरव सोहळा दिमाखात पार पडला. २०२६-२७ च्या असोसिएशन अध्यक्षा विनुता हरिश आणि जिल्हाध्यक्ष डॉ. आशा देशपांडे यांच्या हस्ते सौ. पारठे यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.
पाचगणी इनर व्हील क्लबने गेल्या काही काळात राबवलेल्या सातत्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांमुळे संपूर्ण जिल्ह्यात क्लबचे नाव आदराने घेतले जात आहे. या उत्कृष्ट सामाजिक कार्याची दखल घेत वैयक्तिक पुरस्कारासोबतच पाचगणी क्लबलाही विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. युवा विकास, पर्यावरण संरक्षण, बालकांचे हक्क, जलस्वच्छता आणि आयडब्ल्यू ब्रँडिंग या क्षेत्रांतील उल्लेखनीय व आदर्श प्रकल्पांसाठी क्लबला ‘उत्कृष्टता प्रमाणपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच क्लबच्या वतीने शालेय पायाभूत सुविधांसाठी राबवल्या गेलेल्या ‘हॅपी स्कूल’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमालाही या सोहळ्यात विशेष गौरव प्राप्त झाला.
क्लबच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही आपल्या चोख जबाबदारीचा आणि सेवाभावी वृत्तीचा ठसा उमटवत वैयक्तिक पुरस्कारांवर नाव कोरले. यामध्ये सचिव चांदनी ठडाणी यांना ‘स्टार सेक्रेटरी अवॉर्ड’ (उदयोन्मुख क्लब), खजिनदार सिमरन खान यांना ‘स्टार ट्रेझरर अवॉर्ड’ (उदयोन्मुख क्लब), तर आयएसओ धनश्री करंजकर यांना ‘स्टार आयएसओ अवॉर्ड’ (उदयोन्मुख क्लब) प्रदान करून गौरवण्यात आले. याशिवाय, झोन ३ अंतर्गत ‘अभिलाषा’ विभागीय बैठकीचे अत्यंत नेटके आणि उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल इनर व्हील क्लब ऑफ पाचगणीला विशेष फिरता चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
एकाच भव्य जिल्हास्तरीय कार्यक्रमात पाचगणी क्लबला संस्थात्मक तसेच वैयक्तिक स्तरावर अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्याने, क्लबच्या सामाजिक बांधिलकीची आणि सेवाभावी वाटचालीची जिल्ह्यात मोहर उमटली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल पाचगणी, महाबळेश्वर परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून तसेच सामाजिक संस्थांकडून अध्यक्षा सौ. अंजना पारठे यांच्यासह क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांवर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



