पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : मैदानावरची ताकद, अचूक डावपेच आणि विजयाच्या जबर जिद्दीच्या जोरावर पाचगणी येथील विद्या निकेतन हायस्कूलच्या मल्लांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कौशल्याची छाप पाडत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. बाथा हायस्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत शाळेच्या तब्बल सहा पैलवानांनी आपापल्या वजनगटात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णयशाला गवसणी घातली. या सुवर्णमयी कामगिरीच्या बळावर या सहाही मल्लांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपले स्थान थाटात निश्चित केले आहे.
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील व १७ वर्षांखालील अशा दोनों गटांत विद्या निकेतन हायस्कूलच्या कुस्तीपटूंनी प्रतिस्पर्ध्यांना चितपट करत मैदान मारले. १४ वर्षांखालील गटात ३५ किलो वजनगटात सुरज मेहता, ४५ किलो वजनगटात ओम कदम आणि ५७ किलो वजनगटात क्षितिज केंजळे यांनी उत्कृष्ट पकड व डावांचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.
तर १७ वर्षांखालील गटात आयुष माटे याने ४७ किलो वजनगटात, आरुष गायकवाड याने ६५ किलो वजनगटात आणि हर्षवर्धन दोंदे याने ८६ किलो वजनगटात प्रतिस्पर्धी मल्लांवर मात करत अव्वल स्थान मिळवले.
सहा मल्ल, सहा सुवर्णपदके आणि थेट जिल्हास्तराची सहा तिकिटे! या अभूतपूर्व यशामुळे विद्या निकेतन हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील यशाचा आलेख आणखी उंचावला असून संपूर्ण पाचगणी परिसरातून या मल्लांचे कौतुक होत आहे.
शाळेच्या या सुवर्णमयी कामगिरीबद्दल संस्थाचालक स्वाती बिरामने, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक अथर्व बिरामने सर आणि शिक्षक नितीन सपकाळ यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी विजयी मल्लांचे विशेष अभिनंदन केले. क्रीडा क्षेत्रातील या दैदिप्यमान यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, हे सर्व पैलवान जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतही पाचगणी तालुक्याचा ध्वज असाच फडकत ठेवतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



